वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मनमोहन सिंग सरकारमध्ये गृहमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे ( Sushil Kumar Shinde ) जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. ते मंगळवारी दिल्लीत म्हणाले की ‘मी देशाचा गृहमंत्री असताना जम्मू-काश्मीरच्या लाल चौक आणि दल सरोवरात जायची भीती वाटायची.’
दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये सोमवारी त्यांच्या ‘फाइव्ह डिकेड्स ऑफ पॉलिटिक्स’ या पुस्तकाच्या लोकार्पण कार्यक्रमात शिंदे बोलत होते. या वेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिग्विजय सिंह आणि शिक्षणतज्ज्ञ विजय धर हेही उपस्थित होते. धर हे शिंदे यांचे सल्लागारही राहिले आहेत. शिंदे यांच्या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल म्हणाले, ‘काँग्रेस सरकारमध्ये देशाचे गृहमंत्रीही काश्मीरला जायला घाबरत होते.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सुरक्षा बळकट झाली आहे. आता विरोधी पक्षाचे नेतेही बिनधास्त जम्मू-काश्मीरमध्ये बर्फ खेळत आहेत. गोयल यांनी सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा दोन वर्षांपूर्वीचा काश्मीर खोऱ्यातील एक फोटोही टाकला आहे. त्यात राहुल बर्फावर खेळण्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, जम्मू – काश्मीरमध्ये आता दहशतवाद आणि फुटीरतावाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दहशतवाद आणि दगडफेकीच्या घटनांतही कमालीची घट झाली आहे. पण 370 कलम हटण्यापूर्वी काय स्थिती होती, हे शिंदेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.
मुलगी प्रणिती शिंदे यांना केले पुस्तक अर्पण
शिंदे यांचे पुस्तक २४० पानी असून एकूण आठ विभागात आपल्या राजकीय कारकीर्दीतील विविध विषयांवरचे लेखन केले आहे. सोनिया गांधी यांच्या शुभेच्छा व शरद पवार यांची प्रस्तावना या पुस्तकात आहे. पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीचे हे इंग्रजी आणि हिंदी पुस्तक सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या राजकीय वारसदार, सोलापूरच्या खासदार कन्या प्रणिती शिंदे यांना अर्पण केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App