विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहलगाम येथील हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार आज 232 पर्यटकांना घेऊन इंडिगो विमान श्रीनगरहून मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी विमानतळावर भाजप नेते व मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. दरम्यान, सुमारे 500 पर्यटक आतापर्यंत महाराष्ट्रात परतले आहेत. गुरुवारी दोन विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईत पोहोचले होते.
पहलगाम हल्ल्यात 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला. पुलवामा हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला असल्याचे बोलले जात आहे. अतिरेक्यांनी नाव आणि धर्म विचारून गोळ्या मारल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अतिरेक्यांनी केवळ पुरुषांनाच मारले आहे. घरातील मुख्य व्यक्तीच्या जाण्याने पीडित कुटुंबांवर दुःखाचे मोठे डोंगर कोसळले आहे.
या हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना जीव गमावलेल्या आदिल शाह यांचे कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 5 लाख रुपये तसेच घर बांधून देण्यात येणार आहे. आदिल शाह यांनी अतिरेक्यांच्या हातून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याच्यावर 4 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आदिल शाह यांच्या कुटुंबाशी संवाद साधला व मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक घेऊन पुढील सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आता भारत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणार असे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने तयारी देखील करण्यात येत आहे, हवाई दलाने फायटर विमानांची चाचणी करणे देखील सुरू केले असल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App