राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर व्ही. एस. रामचंद्रन यांच्याकडे घेऊन जाण्याचा सल्ला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांना दिला. शरद पवार यांच्या मेंदू आणि कानाचे त्याचबरोबर मेंदू आणि डोळ्याचे एकमेकांशी कनेक्शन खराब झाले आहे. त्यावर डॉ. व्ही. एस. रामचंद्रन यांच्यासारखे कसलेले मेंदूविकार तज्ज्ञ खरोखर उत्तम उपचार करू शकतील. त्यांच्या उपचारांनी शरद पवार 2029 च्या निवडणुकीपर्यंत “बरे” होतील. त्या निवडणुकीत आणि नंतर देखील ते आपला राजकीय “चमत्कार” करून दाखवतील, असा दावा भाऊ तोरसेकर यांनी केला. Sharad Pawar
आता भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने अत्यंत काळजीपोटी सुप्रिया सुळे यांना हा सल्ला दिल्याबद्दल आपण वेगळे काही म्हणायचे काहीच कारण नाही. कारण कुणालाही काहीही सल्ले देण्याचा भाऊ तोरसेकर यांना राज्यघटनेने अधिकार दिला आहे आणि तो स्वीकारायचा की नाही हे ठरविण्याचा अधिकार त्याच राज्यघटनेने सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्याला देखील दिला आहे.
पण तरी देखील भाऊ तोरसेकरांना ज्याप्रमाणे शरद पवारांची “काळजी” वाटते आणि म्हणून त्यांना डॉ. व्ही. एस. रामचंद्रन यांच्यासारख्या मेंदूविकार तज्ज्ञाकडे घेऊन जाण्याचा सल्ला द्यावासा वाटतो, वास्तविक तसे उपचार यापूर्वी शरद पवारांवर एका “डॉक्टर”ने करून झालेत आणि त्याचा सकारात्मक परिणामही पवारांवर काही वर्षे राहिल्याचा अनुभव सगळ्या महाराष्ट्राने घेतला होता. त्याचबरोबर सध्या देखील एक वेगळेच “डॉक्टर” शरद पवारांवर वेगळ्या स्वरूपाचा उपचार करत आहेत आणि त्याचे काही सकारात्मक परिणाम पवारांच्या प्रकृतीवर वेगवेगळ्या वेळी दिसूनही येत आहेत. फक्त ते भाऊ तोरसेकरांच्या लक्षात आले नसावेत. पण म्हणून काही त्या दोन्ही डॉक्टरांचे तज्ज्ञत्व आणि त्यांनी केलेल्या उपचारांचे महत्त्व कमी होत नाही.
पहलगामच्या हल्ल्यानंतर गनबोटे आणि जगदाळे कुटुंबीयांची भेट घेताना पवारांचे मेंदू आणि कानाचे त्याचबरोबर मेंदू आणि डोळ्याचे कनेक्शन तुटले होते. त्यामुळे त्यांना पहलगाम हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी हिंदूंना धर्म विचारून गोळ्या घातल्या, हे दोन्ही कुटुंबीयांनी सांगितले ऐकू आले नाही किंवा दिसले नाही. म्हणूनच त्यांच्यावर डॉ. रामचंद्रन यांच्या उपचारांची गरज आहे, असे भाऊ तोरसेकर म्हणाले. Sharad Pawar
पण याआधी शरद पवारांना 1991 मध्ये असाच विकार झाला होता. 1991 मध्ये शरद पवार यांना अचानक आपली राजकीय ताकद प्रचंड वाढल्याचे जाणवू लागले होते. एखाद्याची शुगर वाढली किंवा अन्य काही वाढले, तर त्याला जसे जाणवते, तसा शरद पवारांना आपली राजकीय ताकद प्रचंड वाढल्याचा भ्रम पैदा झाला होता. त्यांचा मेंदू आणि डोळे त्याचबरोबर मेंदू आणि कान यांची कनेक्शन कदाचित त्यावेळी “अतितीव्र” झाली होती. त्यामुळे वाढलेल्या शक्तीच्या आधारे आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून थेट पंतप्रधानांच्या खुर्चीत बसू शकतो, असे त्यांना वाटल्याने ते मुंबईतून एकदम दिल्लीत दाखल झाले होते. पण पवारांचा हा शक्तिवर्धनाचा भ्रम दिल्लीत बसलेल्या वेगवेगळ्या डॉक्टरांच्या लक्षात आला आणि त्यातले सगळ्यात तज्ञ डॉक्टर नरसिंह राव यांनी पवारांचा शक्तिवर्धनाच्या भ्रमावर “व्यवस्थित” “उपचार” केले. त्यांना दीड दोन वर्षात अशी काही “ट्रीटमेंट” दिली की पवारांचा शक्तिवर्धनाचा भ्रम दूर झाला. त्यांचे मेंदू आणि कान, मेंदू आणि डोळे यांचे कनेक्शन व्यवस्थित झाले आणि ते मुंबईत मुख्यमंत्री म्हणून परत येऊन स्थिरावले. शरद पवारांच्या मजबूत प्रकृतीला नरसिंह राव यांच्यासारख्या जालीम डॉक्टरचीच ट्रीटमेंट बरोबर लागू झाल्याचे त्यावेळी दिसून आले होते.
आता देखील शरद पवार यांना सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत मेंदू आणि कान त्याचबरोबर मेंदू आणि डोळे यांचे कनेक्शन तुटण्याचा विकार जडला असला, तरी दिल्लीतले सध्याचे सगळ्यात मोठे “डॉक्टर” नरेंद्र मोदी हे करत असलेल्या उपचारांमुळे तिथे त्यांचे तीनही अवयवांचे कनेक्शन व्यवस्थित चालते. त्यामुळे मोदी डॉक्टरांच्या उपचारानुसार शरद पवारांनी 370 कलमाच्या चर्चेत भाग घेतला नाही. ते त्यावेळी संसदेत मतदानाला देखील हजर राहिले नाहीत. त्याचबरोबर waqf सुधारणा कायद्याच्या चर्चेच्या आणि मतदानाच्या वेळी ते संसदेत गैरहजर राहिले. अधून मधून ते गौतम अदानींना भेटले. राहुल गांधींनी मोदी – अदानी संबंधांचा विषय पेटवला होता, त्यावेळी अचूक “टायमिंग” साधून शरद पवारांनी एनडीटीव्हीला मुलाखत देऊन गौतम अदानींचे समर्थन केले होते.
कालच हे नरेंद्र मोदी नावाचे दिल्लीतले “डॉक्टर” गौतम अदानी यांच्याबरोबर केरळ मधल्या विंझिजम मोर्चा उद्घाटनाला हजर होते. तिथे त्यांनी बदलत्या भारताचे वर्णन केले. कम्युनिस्ट मंत्री देखील आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा गौरव करतात हा बदललेला भारत आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर आज पवारांनी पुण्यात गौतम अदानींची भेट घेतल्याची बातमी समोर आली. त्यांनी म्हणे अदानींशी दोन तास चर्चा केली. मोदी + अदानी कालच्या भेटीनंतर आज अदानी + पवार भेट झाली. “डॉक्टर” मोदींच्या उपचारांचा हा ताजा सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यामुळे पवारांची केस हाताबाहेर गेल्याचे भाऊंना कितीही वाटले असले, तरी प्रत्यक्षात ती केस तेवढी हाताबाहेर गेलेली नाही, हेच यातून स्पष्ट झाले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App