विशेष प्रतिनिधी
नांदेड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार वसंत चव्हाण ( Vasant Chavan ) यांचे दुःखद निधन झाले आहे. मध्यरात्री खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या 64 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनाने नांदेड जिल्ह्यावरच नाही तर महाराष्ट्रावर शेककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वसंत चव्हाण यांना गेल्या आठवड्यामध्ये श्वास घेण्याचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री अचानक त्यांची तब्येत प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा तातडीने हैदराबाद येथील किंग्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, हैदराबाद येथील या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
नुकत्याच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नांदेड मधून विजय मिळाला होता. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. नांदेडमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र असे असले तरी नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंत चव्हाण यांनी भाजपला धक्का देत काँग्रेसकडे विजय खेचून आणला होता. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले त्यावेळी वसंत चव्हाण देखील भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चा होती. मात्र, ते काँग्रेस सोबत कायम राहिले. त्यामुळे पक्षाने त्यांना लोकसभेत उमेदवारी देत त्यांना थेट लोकसभेत पाठवले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App