विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज जेव्हा देशाच्या राजकारणात “बॉम्ब” आणि “हायड्रोजन बॉम्ब” फोडण्याची भाषा करण्यात येत आहे, त्यावेळी पंतप्रधान कार्यालयातील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे.Rao-Gowda-Gujral-Vajpayee PMO had ‘atom bomb’ files on Pawar, Mulayam & others: ex-IAS officer
शरद पवार, मुलायमसिंग यादव, जयललिता, एस. बंगराप्पा आदी नेत्यांविषयीच्या “ॲटम बॉम्ब” ठरतील अशा सिक्रेट फाइल्स तर माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि अटल बिहारी वाजपेयी या पंतप्रधानांकडे होत्या, असा धक्कादायक खुलासा पंतप्रधान कार्यालयातील माजी वरिष्ठ अधिकारी एस. एस. मीनाक्षीसुंदरम यांनी केला आहे.
एच. डी. देवेगौडा यांचे राजकीय चरित्र लवकरच प्रसिद्ध होत आहे. या चरित्रामध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांनी आपल्याला राजकीयदृष्ट्या अडथळा ठरू शकतील अशा सर्व नेत्यांविषयी धक्कादायक माहिती असणाऱ्या तसेच त्यांची काही सिक्रेट्स असलेल्या सुमारे एक डझन फाइल्स पंतप्रधान कार्यालयात आपल्याजवळ ठेवल्या होत्या. यामध्ये शरद पवार, मुलायम सिंग यादव, जयललिता, बंगराप्पा आदी नेत्यांचा समावेश होता. काँग्रेसमध्ये नरसिंह रावांना वरिष्ठ नेत्यांचा विरोध होता. शरद पवार हे सुमारे 20 महिने संरक्षणमंत्री होते. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर नरसिंह राव यांनी पवारांना दिल्लीतून पुन्हा मुंबईला धाडून दिले होते. त्यांच्याविषयीची सिक्रेट फाईल नरसिंह राव यांच्याकडे होती.
तसेच देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री असणाऱ्या मुलायम सिंग यादव, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असणाऱ्या जयललिता, राजीव गांधींच्या अखेरच्या काळात त्यांच्या आशीर्वादाने कर्नाटकचे मुख्यमंत्री बनलेले एस. बंगराप्पा यांच्याही सिक्रेट फाइल्स नरसिंहराव यांच्या ताब्यात होत्या. 1996 मध्ये जेव्हा आपण पुन्हा पंतप्रधान होणार नाही हे नरसिंह राव यांना निश्चितपणे वाटले, तेव्हा त्यांनी देवेगौडा यांना आपल्याकडे बोलवून घेतले आणि त्यांचा एक विश्वासू वरिष्ठ अधिकारी नेमा त्याच्याकडे या सिक्रेट फाइल्स द्यायच्या आहेत, असे सांगितले. देवेगौडा यांचा आपल्यावर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी नरसिंह राव यांच्या ताब्यातून फाइल्स घेऊन मला पंतप्रधान कार्यालयात ठेवायला सांगितल्या. त्या फाइल्स मला दाखवू नका. फक्त त्यातला त्यातल्या काही कमेंट्स मला सांगा म्हणजे ब्रीफ करा, असे देवेगौडा यांनी आपल्याला सांगितले होते, असे मीनाक्षी सुंदरम यांनी संबंधित पुस्तकात स्पष्ट केले आहे.
त्यानंतर इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान झाले. त्यांनी वेगळा अधिकारी पंतप्रधान कार्यालयात ठेवण्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवला. या फाइल्स देखील त्यांनी पंतप्रधान कार्यालयात ठेवल्या. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. त्यांनी अशोक सैकिया यांना पंतप्रधान कार्यालयात नेमले मी त्या सिक्रेट फाइल्स अशोक सैकिया यांच्याकडे दिल्या. अटल बिहारी वाजपेयी 2004 पर्यंत पंतप्रधान होते तोपर्यंत त्या फाइल्स पंतप्रधान कार्यालयात होत्या. त्यानंतर त्या फाईलचे नेमके काय झाले हे माहिती नाही, असा खुलासा देखील मीनाक्षीसुंदरम यांनी केला आहे.
2004 नंतर डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले. 2007 मध्ये अशोक सैकिया यांचे निधन झाले. त्यामुळे या महत्वाच्या सिक्रेट फाइल्स नेमक्या कुठे आहेत याचा थांगपत्ता लागलेला नाही. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यांनी नृपेंद्र मिश्र यांना पंतप्रधान कार्यालयात नेमले. परंतु त्यांनी आपल्याकडे कोणत्याही सिक्रेट फाईल्स आल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे.
द प्रिंट या वेबसाइटने ही बातमी दिली आहे. द प्रिंट ने शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. मात्र पवारांच्या निकटवर्तीयाने अशी कोणतीही फाईल असल्यास संदर्भातला इन्कार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App