विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. वारंवार होणाऱ्या पराभवामुळे राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणालेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी तिथे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मुदत संपल्यानंतर सायंकाळी 5.30 ते 7.30 पर्यंत तब्बल 65 लाख मतदारांनी मतदान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे भारतात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींचे विधान अत्यंत निंदनीय
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली. भारतीय लोकशाहीची बदनामी केली. भारतीय संविधानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या लोकशाही संस्थांची बदनामी केली. ते सातत्याने अशा प्रकारची बदनामी करतात. ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. निवडणुकांत वारंवार पराभव झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे.
राहुल गांधी एका विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यानंतरही ते अशा प्रकारे परदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी करत असतील, तर कुठेतरी त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो की, ते नेमका कुणाचा अजेंडा राबवत आहेत? त्यामुळे माझा त्यांना सल्ला आहे. त्यांनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे. जगभरात फिरून भारताची बदनामी केल्याने त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेत विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मते वाढतील. पण ते करण्याऐवजी भारताला बदनाम करण्याचे काम त्यांचे सुरू आहे.
महाराष्ट्रात ते हरले, हरियाणात हरले, दिल्लीत हरले. आता मतदानात हेराफेरी झाल्याचा आरोप ते करत आहेत. अतिशय बाळबोध प्रकारचा हा प्रकार आहे. त्यांनी जनतेत जावे व भारताची बदनामी करणे बंद करावे, असे आमचे त्यांना आवाहन आहे, असे फडणवीस म्हणाले.
अशा प्रकारे त्यांचीच उंची कमी होईल
कोणताही देशभक्त अशा प्रकारे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करत नाही. राहुल गांधी ज्या प्रकारे वर्तन करत आहेत, त्यामुळे त्यांच्याच चारित्र्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी जनतेत जावे. जनतेचा विश्वास जिंकावा. त्यातून त्यांना निवडूक जिंकता येईल. जगात जाऊन कितीही बदनामी केली तरी त्यांना निवडणूक जिंकता येणार नाही. यामुळे त्यांचीच उंची कमी होत जाईल, असेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसून आले. हे एक वास्तव आहे. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी 5.30 पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली. त्यानंतर संध्याकाळी 5.30 ते 7.30 या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केले. असे घडणे केवळ अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करायला साधारण तीन मिनिटे लागतात. जर ही वेळ लक्षातघेतली तर रात्री 2 वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते आणि त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली असा होतो. पण असे कुठेही घडल्याचे पाहण्यास मिळाले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App