विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVM वर आरोपांच्या बंदुकांच्या फैरी झाडणार्या विरोधकांनी आता त्या मशीन वरची बंदूक हटवली आणि ती मतदार यादी कडे वळवली.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सगळे नेते EVM वर चकार शब्द बोलले नाहीत, तर त्यांनी आज महाराष्ट्रातल्या मतदार यादीवर आकडेवारीनिशी ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राहुल गांधींनी स्क्रीनवर छोटे प्रेझेंटेशन दाखवले. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि कोट छापला होता. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची एकत्रित मतदार यादी सर्व पक्षांना द्यावी त्यावरून अभ्यास करत आहे महाराष्ट्राच्या बाबतीत वाईटच बोलायचे झाले, तर निवडणूक आयोगाने मतदार यादीत परस्पर हेराफेरी केली असे म्हणावे लागेल, असा आरोप राहुल गांधींनी केला.
महाराष्ट्रात 2019 ते 2024 दरम्यान 32 लाख मतदार वाढले. पण 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पाचच महिन्यांमध्ये तब्बल 39 लाख मतदार वाढले. हे कसे घडले??, याचे उत्तर निवडणूक आयोगाने आम्हाला द्यावे अशी मागणी राहुल गांधी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात अख्ख्या हिमाचल प्रदेशातल्या मतदारांच्या संख्येएवढी मतदारसंघ वाढली, असा दावा राहुल गांधींनी केला. कामठी मतदारसंघात काँग्रेसला लोकसभा निवडणुकीदरम्यान १ लाख १९ हजार मते मिळाली होती. ती विधानसभा निवडणुकीत कमी झाली नाहीत. पण तिथे विधानसभा निवडणुकीदरम्यान ३५ हजार मतदार वाढले. ती सगळी मते भाजपला मिळाली. हे कसे घडले??, असा सवाल राहुल गांधींनी केला.
महाराष्ट्रातल्या मतदार यादीतून दलित मुस्लिम आणि आदिवासी यांची नावे अनेक मतदारसंघांमधून वगळली गेली हे आमच्या निदर्शनास आले, असा दावाही राहुल गांधींनी केला. राहुल गांधींच्या सगळ्या दाव्यांना संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी दुजोरा दिला.
पण आजच्या अख्ख्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधी, संजय राऊत किंवा सुप्रिया सुळे यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVM बद्दल चकार शब्द उच्चारला नाही किंवा त्याविषयी तक्रार केली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर त्याचबरोबर हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सर्व विरोधकांनी EVM घोटाळ्याच्या आरोपांची राळ उडवली होती. परंतु, निवडणूक आयोगाने वेळोवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते आरोप ठामपणे फेटाळून लावले होते. त्यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी, संजय राऊत किंवा सुप्रिया सुळे यांनी EVM वरची आरोपांची बंदूक हटविली आणि ती महाराष्ट्रातल्या मतदार यादी कडे वळवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App