नाशिक : इंदिरा गांधींच्या काळात सर्व समावेशक धोरण अवलंबलेल्या काँग्रेसने 1990 नंतरच्या काळात चुकीची धोरणे अवलंबल्याने दलित, आदिवासी, अतिपिछडे आणि अल्पसंख्यांक काँग्रेस पासून दूर गेले, या चुका जर सुधारल्या, तर हे सगळे वर्ग काँग्रेसच्या पाठीशी पुन्हा उभे राहतील, असे वक्तव्य राहुल गांधींनी राजधानीतल्या एका कार्यक्रमात केले. पण त्यांनी अत्यंत चलाखीने 1990 नंतरच्या चुकांचे खापर “गांधी” नसलेल्या नेत्यांवर फोडून ते मोकळे झाले.
काँग्रेसने राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये दलित, आदिवासी, अतिपिछडे आणि अल्पसंख्यांक इन्फ्लुएन्सर्सचा एक मोठा मेळावा घेतला. त्यामध्ये अनेकांची भाषणे झाली. यात स्वतः राहुल गांधींनी भाषण केले. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना 1990 नंतरच्या राजकीय चुकांविषयी परखड शब्दांमध्ये सुनावले. राहुल गांधींनी काँग्रेसच्या चुकांविषयी भाष्य केल्याने त्यासंदर्भातल्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. परंतु, राहुल गांधींची त्यातली राजकीय चलाखी मात्र फारशी कुणी समोर आणली नाही.
इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या काळापर्यंत दलित, आदिवासी, अतिपिछडे, अल्पसंख्यांक, वंचित हे सगळे समाज काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे होते. कारण या सगळ्या नेत्यांनी सर्वसमावेशक धोरण अवलंबले होते. परंतु, 1990 नंतर काँग्रेसच्याच नेत्यांच्या काही चुका झाल्या. त्यामुळे हे सगळे समाज हळूहळू काँग्रेस पासून दूर गेले. त्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला सगळ्याच निवडणुकांमध्ये बसला. काँग्रेसचा मोठा जनाधार या काळामध्ये घटला. इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या वर्गाला केवळ राजकीय प्रतिनिधित्व मिळवून चालणार नाही, तर देशातल्या सर्व महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्यांचा हिस्सा आणि त्यांची भागीदारी वाढलीच पाहिजे, असे प्रतिपादन राहुल गांधींनी केले.
राहुल गांधींनी काँग्रेसच्या चुका काढल्या म्हणून त्यांच्या भाषणाला व्यापक प्रसिद्धी मिळाली. परंतु त्यातली राजकीय चलाखी मात्र फारशी कुणी समोर आणली नाही.
राहुल गांधींनी 1990 पूर्वी काँग्रेसमध्ये सगळे अलबेल होते. कारण इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्याच्याही आधी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व काँग्रेसला होते. परंतु 1990 नंतर गांधी परिवाराकडून काँग्रेसचे नेतृत्व गांधी नसलेल्या नेत्यांकडे गेले. त्यामुळे काँग्रेस कडून काही गंभीर चुका झाल्या. त्याचा परिणाम म्हणूनच दलित, पिछडे, अतिपिछडे, आदिवासी अल्पसंख्यांक असा मोठा जनसमुदाय काँग्रेस पासून दुरावला, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले. यामध्ये राहुल गांधींनी कुठल्याही “गांधी” नसलेल्या नेत्यांची नावे घेतली नाहीत किंवा त्यांच्यावर नावे घेऊन दोषारोप देखील केला नाही. त्यांनी फक्त 1990 नंतरच्या काळाचा उल्लेख केला. परंतु, त्यामुळेच “गांधी” नसलेल्या नेत्यांवरच त्यांचा “कटाक्ष” होता हे उघड दिसले.
– 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणा
वास्तविक 1990 च्या काळापर्यंत देशाची आर्थिक स्थिती टप्प्याटप्प्याने घसरत गेली होती. त्यामुळेच 1991 मध्ये सोने गहाण ठेवायची वेळ भारताच्या सरकारवर आली होती. परंतु, 1991 नंतर नरसिंह राव यांच्या सरकारने आर्थिक सुधारणा धोरण अवलंबून देशाची अर्थव्यवस्था सुधारली होती. देशाला वेगाने प्रगतीकडे नेले होते. त्यावेळी त्यांनी आधीच्या सरकारांनी केलेल्या चुका सुधारल्या होत्या, ज्यांचे नेतृत्व इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांनी केले होते. त्यावेळी नरसिंह राव यांनी काँग्रेसचे सामाजिक धोरण बदलले नव्हते. किंवा त्यांच्या नंतरच्या “गांधी” नसलेल्या कुठल्याच काँग्रेस अध्यक्षाने काँग्रेसचे सामाजिक धोरण बदलले नव्हते.
1990 नंतरच्या काळात काँग्रेसचा जनाधार घटला ही वस्तुस्थिती राहुल गांधींनी मांडली असली तरी त्यामध्ये केवळ “गांधी” नसलेल्या काँग्रेस नेतृत्वाचा दोष नव्हता. कारण “गांधी” नसलेल्या काँग्रेस अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कधीच लोकसभेमध्ये 100 खासदार संख्येच्या खाली आला नव्हता. काँग्रेस पक्षाची खासदार संख्या “गांधी” असलेल्या काँग्रेस अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली 2014 नंतर 100 च्या खाली आली. त्यामध्ये खुद्द राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोन “गांधी” असलेल्या काँग्रेस अध्यक्षांचा समावेश होता. परंतु ही वस्तुस्थिती असताना त्यावर मात्र राहुल गांधींनी बोट ठेवले नाही. त्यांनी 1990 नंतरच्या चुकांचे खापर “सिलेक्टिवली” “गांधी” नसलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वावर ठेवले. राहुल गांधींची ही चलाखी माध्यमांना दिसली नाही, म्हणून ती आवर्जून समोर आणावी लागली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App