नाशिक :
राष्ट्रवादीला “खोलवर” नडतेय पोर्शे कार अपघात प्रकरण काका – पुतण्यांचे गट करत आहेत एकमेकांचेच वस्त्रहरण!! असे चित्र पुण्यासह सगळ्या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. या अपघात प्रकरणातले ताणेबाणे असे काही एकमेकांमध्ये गुंतले आहेत की त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आणि भाजप यांच्यातला सुप्त संघर्षही पुण्यासारख्या शहरात अधून मधून उफाळत चालला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकाच महायुतीत असले तरी पुण्यासारख्या शहरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे संबंध महायुतीतल्या एकजिनसी पक्षांसारखे नाहीत. त्यामुळे पोर्शे कार अपघात प्रकरणात राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याची संधी आली, तर ती भाजपचे कार्यकर्ते सोडायला तयार नाहीत.
पोर्शे कार अपघातातला मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल,, वडील बिल्डर विशाल अग्रवाल, वेदांतचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल या तिघांना पुणे जिल्हा न्यायालयाने 31 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण त्याच बरोबर अग्रवाल आणि पवार यांच्यातले संबंध मात्र उघड्यावर आले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या भोवती संशयाचे दाट वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल याचा वकील विशाल पाटील हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. एका पत्रकार परिषदेत पवारांना या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी तो प्रश्न झटकून टाकला, तर अजित पवारांना तोच प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पत्रकारांना झापले. पण एकूण आरोपीला वाचवायला पवारच पुढे आले हे यातून उघड्यावर आले.
त्या पलीकडे जाऊन अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे या प्रकरणात उरते अडचणीत आले. एक तर ते बिल्डर अग्रवालकडे आधी नोकरी करत होते. बड्या बापाच्या बेट्याने दोन इंजिनियर्सचे बळी घेतल्यानंतर सुनील टिंगरे यांनीच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. त्याचबरोबर ससून रुग्णालयात ब्लड सॅम्पल बदलण्यात 3 लाख रुपयांची लाच देण्यात आली हे प्रकरण उघड्यावर आल्यानंतर दोन डॉक्टर अडचणीत आले आणि अटकेत गेले. या प्रकरणात देखील सुनील टिंगरे यांचेच नाव समोर आले. इतकेच काय पण या संदर्भात थेट अजित पवारांवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केले. त्यांनी अजितदादांचा फोन फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडे तपासाला द्या. अजितदादांचा राजीनामा घेऊन त्यांची “लाय डिटेक्टर” चाचणी करा, अशी मागणी दमानिया यांनी केली. त्यावर अजित पवारांनी खुलासा केला पण मुळात अजित पवारांभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले ते दूर झाले नाही. उलट ससून प्रकरणात ज्या दोन डॉक्टरांना अटक झाली, त्यापैकी डॉ. अजय तावरे यांनी तर आपण गप्प बसणार नाही. पोलीस तपासात सगळ्यांची नावे घेऊन असा इशारा दिल्याने राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे धाबे दणाणले.
मुळात आमदार सुनील टिंगरे यांनीच डॉ. अजय तावरे याची शिफारस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केल्याची बातमी फुटली. तसे पत्र माध्यमांच्या हाताला लागले त्यामुळे सुनील टिंगरे यांच्या बरोबरच हसन मुश्रीफ देखील अडचणीत आले. राष्ट्रवादीतला हा घोळात घोळ वाढत गेला.
पोर्शे कार अपघात प्रकरणात सुमारे पुण्यातले सुमारे 49 पब आणि बार पोलिसांनी बंद केले त्यांना सील ठोकले. त्यामुळे त्यांचा धंदा बसला. काही बार चालकांनी पुण्यात आंदोलन केले. यातले बहुतांश बारचालक कुठे ना कुठे तरी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचे बोलले गेले. पोर्शे कार अपघातातल्या बातम्या मराठी माध्यमांनी लावून धरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली. या बातम्यांमधून वेगवेगळे अँगल समोर येत गेले आणि त्यातला प्रत्येक भाग कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादीशी जोडला गेला.
बिल्डर अग्रवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय याविषयी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांचे नाव घेऊन आरोप केला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी कोणाचा दबाव होता??, तो का दबाव आला होता??, याची चौकशी करावी अशी मागणी आव्हाड यांनी केली.
– ससूनच्या प्रतिमेची सुप्रिया सुळेंना चिंता
ससून रुग्णालयातला फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा मुख्य डॉ. अजय तावरे याला अटक झाल्यानंतर त्याने आपण गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर सुप्रिया सुळे कार्ड ऍक्टिव्हेट झाले. सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक भली मोठी पोस्ट लिहून ससून वर आलेले संशयाचे ढग शासनाने तिथल्या कारभारावर श्वेतपत्रिका काढून दूर करावेत, अशी मागणी केली. ससून रुग्णालयाच्या प्रतिमेविषयी सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. रुग्णसेवेत खूप वर्षे खपत असलेल्या ससून सारख्या रुग्णालया संदर्भात संशयाचे वातावरण राहणे चांगले नाही, असे शब्द त्यांनी वापरले. परंतु अटकेत गेलेले डॉक्टर अजय तावरे यांनी आपण गप्प बसणार नाही, असा इशारा दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांची सोशल मीडिया पोस्ट आल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी भोवतीच संशयाचे ढग तयार झाले.
– तपासावर फडणवीसांचे लक्ष, राष्ट्रवादीची गोची
पोर्शे कार अपघातातले गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र एकनाथ शिंदे आणि त्यातही प्रामुख्याने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्सनली लक्ष घातल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेत्यांची खरी गोची झाली. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी कठोर भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हस्तक्षेपालाच चाप बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इथेच खरी बिल्डर अग्रवाल आणि पवार यांच्या संबंधांमध्ये “राजकीय मेख” मारली गेली आहे.
पुण्यासारख्या शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संबंध बऱ्यापैकी ताणले गेले आहेत. जरी हे दोन्ही पक्ष आज महायुतीचे घटक असले, तरी त्यांचे वेगवेगळ्या फळ्यांमधले कार्यकर्ते मात्र थेट एकमेकांच्या विरोधातच आहेत. अशावेळी पोर्शे कार अपघात प्रकरणात राष्ट्रवादीचा कुठलाही गट अडचणीत आला, भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचे वेगवेगळे स्कोअर काढून घेण्याची संधी आली आहे, असे वाटणे यात नवल नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App