उठलेले राजकीय बस्तान पुन्हा बसविण्यासाठी राजकीय मेळावे भरवून गोदा आरतीमध्ये हस्तक्षेपाचे माजी आमदाराचे “उद्योग”!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : पुण्यक्षेत्र काशीतील श्री गंगा मातेच्या आरतीच्या धर्तीवर गंगा गोदावरी मातेची नियमित आरती व्हावी, यासाठी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने पहिला 10 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर ही आरती 19 फेब्रुवारी शिवजयंती पासून सुरू होणार आहे. परंतु, पुरोहित संघातील काहीजणांनी व्यक्तिगत अहंकारामुळे सुरवातीलाच गोदावरी आरती मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, पण तो कमी पडला म्हणून की काय आता त्या पलीकडे जाऊन राजकीय मेळावे भरवून गोदावरी आरती मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

आधीच संपलेली राजकीय कारकीर्द पुन्हा सुरू करण्यासाठी आणि उठलेले बस्तान पुन्हा बसविण्यासाठी गोदावरी आरती मध्ये हस्तक्षेप करण्याचे “उद्योग” एक माजी आमदार करत असल्याचे समोर आले आहे.



वंशपरंपरागत पुरोहितांकडेच या आरतीची व्यवस्था सोपवावी. इतरांचा या आरतीशी काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेत पुरोहित संघाच्या काही सदस्यांनी नाशिक मधील संत महंतांना भडकविण्याचे प्रयत्न केले. पण तरी देखील गोदावरी आरती उपक्रम पुढे नेण्याची तयारी नाशिककरांनी केलीच. त्यामुळे आता केवळ संत महतांना भडकवून भागणार नाही. कुठल्यातरी राजकीय नेत्याला हाताशी धरले पाहिजे, असा विचार करून पुरोहित संघातील काही सदस्यांनी एका माजी आमदाराला गोदा आरतीच्या वादात ओढून घेतले. गोदावरी आरतीच्या हक्काची भाषा करत राजकीय मेळावे भरवण्याचे “उद्योग” या माजी आमदाराने चालविले आहेत. गोदा आरतीच्या निमित्ताने हे माजी आमदार पुन्हा प्रकाश झोतात येऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या बेतात आहेत.

नाशिक मध्ये गंगा गोदावरीची आरती करण्याचा अधिकार फक्त वंश परंपरेच्याच पुरोहितांचाच आहे. इतरांचा नाही. त्यामुळे शासकीय निधीतून होणारी आरती गंगा गोदावरीचे वंशपरंपरेचेच पुरोहितच करतील. इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका पंचकोटी पुरोहित संघाने घेतली. पण या भूमिकेशी नाशिक मधले बहुसंख्य तीर्थपुरोहित सहमत नाहीत. उलट गोदावरीची आरती तीर्थपुरोहितांसह अन्य सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक पद्धतीनेच करावी, अशी भूमिका बहुसंख्य तीर्थपुरोहितांनी देखील घेतली. पण अशी सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या तीर्थपुरोहितांवर दबाव आणण्याचाही प्रकार पुरोहित संघाने केला आहे. यासाठी बड्या नावांचा आधार घेत त्यांची नावे देखील वादात गोवण्याचा प्रकार सुरू आहे.

त्याचबरोबर गोदावरी आरतीचे केवळ वंशपरंपरेचे अधिकार या भूमिकेमुळे वंशपरंपरेचे अधिकार आणि राज्यघटनेने दिलेले धर्म स्वातंत्र्याचे अधिकार यात संघर्ष उत्पन्न झाला आहे. पंढरपूर आणि कोल्हापूर येथे काही वंशपरंपरागत पुरोहित आणि सेवेकऱ्यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमुळे अनेकांचे हक्क गेले. ते राज्यघटना आणि कायद्याच्या कसोटीवर टिकू शकले नाहीत. तशीच अवस्था नाशिक मध्ये गोदावरी आरतीच्या वंशपरंपरेच्या हक्कासंदर्भात होण्याची शक्यता आहे.

हे सगळे राजकीय नेत्यांना समजत असूनही ते केवळ नाशिकच्या राजकारणात स्वतःचे बस्तान पुन्हा बसवण्यासाठी गोदा आरती सारख्या आध्यात्मिक आणि धार्मिक उपक्रमाला वेठीला धरत आहेत.

शिवाय कुठलाही शासकीय निधी हा कुठल्याही खासगी संस्थेस कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन देताच येत नाही. त्याचबरोबर त्या निधीची संपूर्ण व्यवस्था शासकीय नियंत्रणाशिवाय खासगी संस्थेकडे सोपविताही येत नाही. त्यामुळे शासकीय निधीतून गंगा गोदावरी आरती करायची, पण निधीचे संपूर्ण नियंत्रण आपले ठेवायचे, ही भूमिका पुरोहित संघाला भविष्यकाळात घातक ठरू शकते. केवळ व्यक्तिगत अहंकारापोटी गंगा गोदावरी आरती मध्ये अडथळा आणून सगळ्या नाशिककरांच्या आणि देशा-परदेशातून इथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या भक्तीभावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. त्याला आता राजकीय स्वार्थातून काहीजण फूस देत गोदा आरतीच्या संपूर्ण उपक्रमालाच चूड लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गंगा गोदावरी क्षेत्री येऊन लाखो भाविक आपली विविध धार्मिक कृत्ये करतात. त्या निमित्ताने पुरोहितांपासून अनेकांना व्यवसाय, रोजगार त्यातून मिळतात. या व्यवसाय – रोजगारालाही अशा राजकीय हस्तक्षेपाचा फटका बसू शकतो. त्यामुळे गोदावरी आरती सारख्या आध्यात्मिक आणि धार्मिक उपक्रमात राजकीय हस्तक्षेप नको. कोणाचाही वैयक्तिक अहंकार नको, अशी हजारो नाशिककरांची भावना आहे.

गोदावरी आरती सारखा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी ललामभूत ठरणारा आहे. तो केवळ वैयक्तिक अहंकार आणि राजकीय हस्तक्षेप यांच्यामुळे डागाळला जाऊ नये, याची दक्षता घेण्याची खरी गरज आहे. नाशिक आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान ठरणारी गोदावरी आरती अधिक भव्य दिव्य आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने हजारो नाशिककर ठोस पावले उचलत आहेत.

Political interference in godavari aarti event by former mla

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात