वृत्तसंस्था
चंडीगढ : पंजाब काँग्रेस मध्ये गुस्सा पुन्हा फुटला आहे. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातला वाद उफाळून रस्त्यावर आला आहे. जेव्हापासून सुखजिंदर सिंह रांधवा यांनी पंजाबचे गृहमंत्रालय सांभाळले आहे तेव्हापासुन नवज्योत सिंग सिद्धू त्यांच्यावर नाराज आहेत. ते जर नाराज असतील तर मी त्यांच्या पायावर गृहमंत्री पदाचा कार्यभार ठेवायला तयार आहे, असे वक्तव्य सुखविंदर सिंग रंधावा यांनी केले आहे. Political fight in Punjab congress
पंजाब मध्ये काँग्रेसने उपमुख्य मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करता निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू हे प्रचंड अस्वस्थ आहेत. आपले नाव मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसने जाहीर करावे यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले आहे. परंतु काँग्रेस हायकमांडने आणि पंजाबच्या काँग्रेस नेत्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मागणीला धूप घातलेली नाही.
या पार्श्वभूमीवर नवज्योत सिंग सिद्धू हे काँग्रेसच्या सरकार मधील विविध मंत्र्यांवर कायम निशाणा साधताना दिसतात. सुखजिंदर सिंग रंधवा हे गृहमंत्री म्हणून चांगले काम करत नसल्याचा आरोप त्यांनी भटिंडा मध्ये केला होता. यावरून संतापलेल्या सुखजिंदर सिंह रांधवा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची इच्छा असेल तर गृहमंत्री पदाचा कार्यभार मी त्यांच्या पायावर ठेवायला तयार आहे, असे उद्विग्न उद्गार काढले आहेत.
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी यांनी देखील नवज्योत सिंग सिद्धू यांची इच्छा असेल तोपर्यंत मी त्यांच्या बरोबर काम करत राहीन, असे सूचक उद्गार काढून सिद्धू आणि आपल्यातले “राजकीय अंतर” वाढल्याचे संकेत दिले आहेत.
नवज्योत सिंग सिद्धू हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले आणि त्यांनी आग्रह केल्यामुळे काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून घालविले असले तरी नवज्योत सिंग सिद्धू यांची प्रत्येक गोष्ट हायकमांड ऐकत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच सिद्धू अस्वस्थ आहेत आणि आता प्रदेश काँग्रेसचे नेतेही त्यांच्यापासून राजकीय अंतर राखून वागत असल्याचे दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App