विशेष प्रतिनिधी
गुरदासपूर : पंजाबमध्ये झालेल्या ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ सप्टेंबर रोजी राज्याच्या दौर्यावर गेले. त्यांनी हवाई सर्वेक्षणाद्वारे पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर गुरदासपूर येथे अधिकाऱ्यांसोबत आणि लोकप्रतिनिधींसोबत त्यांनी पुनर्वसन आढावा बैठक घेतली.
या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी राज्यासाठी १,६०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदत पॅकेजची घोषणा केली. ही रक्कम आधीच राज्याकडे उपलब्ध असलेल्या १२,००० कोटी रुपयांव्यतिरिक्त असेल. तातडीच्या मदतीसाठी राज्य आपत्ती निवारण निधीचा दुसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी देखील आगाऊ दिला जाणार आहे.
मोदींनी या वेळी शेतकरी आणि जनावरपालकांसाठी विशेष उपाययोजना जाहीर केल्या. ज्यांच्याकडे वीज कनेक्शन नाही अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देण्यात येणार आहे. गाळ भरलेल्या किंवा वाहून गेलेल्या बोअरवेल्सच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रकल्पनिहाय मदत देण्यात येईल. डिझेलवर चालणाऱ्या पंपांसाठी सौर पॅनल व मायक्रो इरिगेशन (Per Drop More Crop) योजनेसह सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच पशुपालकांना मदतीसाठी मिनी किट्सचे वितरण करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की पुराच्या परिणामातून बाहेर येण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाची गरज आहे. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत पुरग्रस्तांना घरे पुन्हा बांधण्यासाठी मदत.. राष्ट्रीय महामार्गांची पुनर्बांधणी व वाहतूक व्यवस्थेची दुरुस्ती. शाळांची पुनर्बांधणी आणि विद्यार्थ्यांना तातडीचे साहाय्य. पीएम राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मार्फत तातडीच्या गरजांची पूर्तता.
राज्यातील नुकसानीचे सविस्तर अहवाल आणि विशिष्ट प्रस्ताव आल्यावर त्यानुसार केंद्र सरकार आणखी प्रकल्पनिहाय मदत देईल, असे मोदींनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या या भेटीमुळे पंजाबमधील पुरग्रस्त शेतकरी, पशुपालक व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या पॅकेजमुळे पुनर्वसन आणि पुनर्बांधणीची गती वाढेल अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App