विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत सातत्याने अपयशी ठरणारी विरोधी ऐक्याची बैठक पाटण्यात यशस्वी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असला तरी पाटण्यात जन चळवळीच्या रूपाने विरोधी ऐक्य जोमात, पण आकड्यांच्या हिशेबात काँग्रेस तोट्यात!!, अशी स्थिती आली आहे. कारण 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन मोदी सरकार विरोधात लढण्याची जी रणनीती ठरवली आहे, ती 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याची आहे. अशा स्थितीत सर्वाधिक “त्याग” काँग्रेसलाच करावा लागण्याची चिन्हे आहेत!! कारण काँग्रेसला बाकीचे सर्व प्रादेशिक पक्ष मिळून मागे रेटत स्वतःचा वाटा वाढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Opposition unity looses of Congress in numbers
काँग्रेसचे आकडे
काँग्रेसने आतापर्यंतच्या इतिहासात कधीच लोकसभेच्या 400 पेक्षा कमी जागा लढवलेल्या नाहीत. शिवाय विरोधी ऐक्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर यूपीएचा प्रयोग वगळता कधीच निवडणूक पूर्व युती किंवा आघाडी केलेली नाही. युपीए 1 ही 2004 च्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली, पण यूपीए दोन 2009 मध्ये साधारणपणे एकत्र निवडणूक लढवली. त्यावेळी काँग्रेसला 209 जागांवर विजय मिळाला होता. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने 464 जागा लढवल्या, त्यापैकी फक्त 44 जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. काँग्रेसने आतापर्यंत सर्वात कमी जागा लढवल्या, त्या 421 आणि त्यातून काँग्रेसला 54 खासदार निवडून आणता आले.
‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांनी टोळीयुद्ध दिसणार’’ आशिष शेलारांचं भाकीत!
या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयाचे प्रमाण कितीही कमी जास्त राहिले असले तरी काँग्रेसने आतापर्यंत कधीच 400 पेक्षा कमी जागा लढवलेल्या नाहीत, हे त्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. अशा स्थितीत बाकीच्या सर्व विरोधकांना मिळून 143 जागा उरतात.
काँग्रेस वगळून काल 14 प्रादेशिक पक्षांचे नेते बैठकीत सहभागी झाले होते. या सर्व प्रादेशिक पक्षांची ताकद देखील त्यांच्या प्रदेशांपुरती मर्यादित आहे. पण भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा आग्रह धरून हे सर्व प्रादेशिक नेते आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेसला मागे रेटण्याचा जोरदार प्रयत्न करणार आहेत. सर्वांत मोठी राज्ये असणाऱ्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू मध्ये काँग्रेसचे अस्तित्व तोळामासा आहे. तिथले अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन हे सर्व नेते काँग्रेसवर नुसती कुरघोडी करत नाहीत तर ते पूर्ण वर्चस्व राखून आहेत. अरविंद केजरीवाल दिल्ली आणि पंजाब मध्ये काँग्रेसला उभे करणार नाहीत महाराष्ट्रात शरद पवार काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करणार.
– 350 ते 400
या सगळ्याचा राजकीय अर्थ असा की भाजपशी सर्व विरोधकांना मिळून एकाच एक टक्कर घेताना “राजकीय त्याग” मात्र फक्त काँग्रेसला करावा लागणार!. कारण काँग्रेसला सर्व प्रादेशिक पक्ष मिळून मागे रेटून 350 ते 400 एवढ्याच जागा लढवण्यासाठी मोकळ्या ठेवण्याच्या बेतात आहेत. अशा स्थितीत काँग्रेसच्या यशाचे प्रमाण देखील मर्यादित राहिले, तर भविष्यात येणाऱ्या तथाकथित सत्तेच्या वाट्यात काँग्रेस घाट्यात अशी स्थिती येऊ शकते, हे भाकित करायला फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करावा लागणार नाही.
– विरोधी ऐक्याची वातावरण निर्मिती
कर्नाटक मधल्या विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान मधल्या सर्वेक्षणानंतर देखील काँग्रेसमध्ये तिथे जान आली आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे नेते बाकीच्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांपुढे कितपत झुकतील आणि मागे सरकतील??, याविषयी दाट शंका आहे. विरोधी ऐक्याची बैठक पाटण्यात यशस्वी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असला आणि हे सर्व नेते नंतर सिमल्यात भेटणार असले तरी त्यातून “विरोधी ऐक्याची वातावरण निर्मिती” यापलीकडे ते नेमके राजकीय व्यवहाराच्या पातळीवर काय आणि कसे साध्य करणार??, हा मूलभूत आणि गंभीर प्रश्न आहे. काँग्रेसच्या “त्यागा”ची मर्यादा बाकीचे विरोधक किती ताणून धरणार आणि काँग्रेस त्यांना किती ती ताणू देणार??, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App