विरोधकांचा जोर ऐक्यावर पण मोदींचीच प्रतिमा घेतात डोक्यावर!! अशी आज देशातल्या सर्वच विरोधी नेत्यांची अवस्था झाली आहे. आत्तापर्यंत एकटे राहुल गांधीच मोदी “डोक्यात” ठेवून त्यांच्या विरोधात तीव्र प्रचार करत होते. तो प्रचार काँग्रेससाठी “काउंटर प्रॉडक्टिव्ह” ठरत होता म्हणून अनेक रणनीतीकारांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला मोदींचे नाव घेऊ नका, असा सल्ला दिला होता. (अर्थात त्यांनी तो मान्य केला नाही हा भाग अलहिदा) पण हाच राजकीय सल्ला आज काँग्रेस सह सर्व विरोधकांना देण्याची वेळ आली आहे. Opposition leaders harping against Modi proving counter productive
कारण बाकीच्या सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधींसारखाच टोकाचा मोदी विरोध दाखवायला सुरुवात केली आहे. वास्तविक विरोधकांच्या पाटण्यातल्या बैठकीत हजर राहिलेल्या नितीश कुमार, शरद पवार, एम. के. स्टालिन, उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध आहेत. ममता बॅनर्जी यांनी तर त्यांना बंगालचे विशेष आंबे पाठवले आहेत. या सगळ्या नेत्यांचा राजकीय इतिहास भाजप विरोधातला असला तरी तो फारसा मोदी द्वेष दाखवत नाही. पण विरोधी ऐक्याच्या निमित्ताने हे नेते देखील काँग्रेसच्या मोदी विरोधी बँड वॅगनमध्ये सामील झाल्याने सगळ्याच विरोधकांची “मोदी विरोधभक्ती” वाढली आहे आणि तीच नेमकी मोदी विरोधकांना राजकीयदृष्ट्यात खड्ड्यात घालणारी किंबहुना “काउंटर प्रॉडक्टिव्ह” ठरणार आहे!!
प्रशांत किशोर यांचा सल्ला
बिहारच्या राजकारणात नुकतेच उतरलेले आणि काँग्रेसचे माजी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वेगळ्या भाषेत हाच इशारा दिला आहे. मोदी विरोधकांनी एकत्र येऊन बैठक घेऊन, एकत्र चहा पिऊन आणि त्यानंतर एकत्र पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचे ऐक्य साध्य होणार नाही. त्यातून मोदींचा केसही वाकडा होणार नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. जनतेमध्ये जावे लागेल. जनतेशी संवाद करावा लागेल आणि तो संवाद करताना मोदी विरोधात फार बोलून चालणार नाही, तर आपण मोदींपेक्षा किती चांगले आहोत हे जास्त ठासून सांगावे लागेल आणि नेमके हेच कोणत्याही विरोधी पक्ष नेत्यांना जमणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशांत किशोर यांनी दिला आहे. या इशाऱ्याकडे आधी काँग्रेसने आणि राहुल गांधींनी पूर्ण दुर्लक्ष केले. कर्नाटक वगळता बाकीच्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसला 2019 नंतर सातत्याने अपयश आले. पण काँग्रेसमध्ये “सुधारणा” दिसली नाही.
आत्तापर्यंत बाकीचे विरोधक निदान मोदींची एवढी तीव्र विरोधभक्ती तरी करत नव्हते. पण आता पाटण्याच्या बैठकीत जे चित्र दिसले ते मोदींची विरोधभक्ती तीव्र होत चालल्याचेच लक्षणे आहेत आणि ही विरोधभक्तीच सर्वांना काँग्रेस बरोबरच राजकीय दृष्ट्या खड्ड्यात घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे “विरोधकांचा जोर ऐक्यावर आणि मोदींची प्रतिमा डोक्यावर” हे चित्र निर्माण झाले आहे.
मोदींना “गंभीर” पर्याय नाही
बरं तीव्र मोदी विरोध भक्ती करून सर्व विरोधक खऱ्या अर्थाने एकत्र येऊन त्यांना पर्याय देण्याची गंभीर शक्यता आहे का??, याचा विचार केला तर तसे अजिबात नाही, हेच त्याचे उत्तर आहे. कारण विरोधकांच्या आत्तापर्यंत एवढ्या बैठका झाल्या पण त्यांना औपचारिक आघाडीची निर्मिती करता आलेली नाही. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी पूर्ण तुटल्यात जमा आहे. पण देशपातळीवर देखील केवळ विरोधकांचा ऐक्यासाठी नुसता बैठकांवर भर आहे, पण बाकीच्या कृतीचा जोर त्यात दिसत नाही. विरोधकांच्या आत्तापर्यंत अनेक बैठका झाल्या पण त्यांना साधा त्यांच्या आघाडीचा संयोजक नेमता आलेला नाही. मग आघाडीचा नेता एकमताने निवडणे तर दूरच!! हे सर्व विरोधकांचे खरे अपयश आहे आणि मोदींची कितीही तीव्र “विरोधभक्ती” केली, तरी मोदी त्यांना “प्रसन्न” होणार नाहीत!! याचीच चिन्हे वास्तवात दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App