विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : समोसा, जिलेबी, लाडू यांसारखे पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून काही वृत्तमाध्यमांतून आणि सोशल मीडियावर जोरात फिरत होत्या. या दाव्यांनुसार, आरोग्य मंत्रालयाने या खाद्यपदार्थांमुळे हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा वाढण्याचा धोका असल्याचे नमूद करून त्यावर इशारा दिला असल्याचा खोटा प्रचार केला जात होता.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अधिकृत माहिती पडताळणी यंत्रणेने, म्हणजेच PIB Fact Check ने, अशा सगळ्या बातम्या फेटाळून लावत त्या पूर्णतः खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
पीआयबीने ट्विटर/X हँडलवरून म्हटले की, आरोग्य मंत्रालयाने समोसा, जिलेबी किंवा लाडू यांसारख्या कोणत्याही खाद्यपदार्थावर आरोग्यविषयक चेतावणी दिलेली नाही. हे दावे खोटे आहेत.”
पीआयबीने सांगितले की, आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच जाहीर केलेला सल्ला हा सर्वसामान्य आरोग्य दृष्टिकोनातून असून, त्यात अति साखर, तेल, मीठ यांचे मर्यादित सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, कोणत्याही पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थावर बंदी, इशारा किंवा आरोग्य सूचना दिलेली नाही.
दरम्यान, ‘ईट राईट इंडिया’ या केंद्र सरकारच्या उपक्रमाचा संदर्भ देत सोशल मीडियावर काहींनी चुकीचा अर्थ काढत, या मोहिमेचा उद्देशच समोसा-जलेबीवर बंदी घालण्याचा असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात ही मोहीम जनजागृतीवर आधारित असून, ती कोणत्याही अन्नपदार्थावर बंदी लादत नाही. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि संतुलित आहाराविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
पीआयबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्याआधी अधिकृत सरकारी स्रोत तपासावेत. चुकीच्या बातम्यांमुळे समाजात संभ्रम आणि भीतीचं वातावरण निर्माण होतं, जे हानिकारक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App