विशेष प्रतिनिधी
साना (येमेन) : भारतीय नर्स निमिषा प्रिया या सध्या येमेनच्या तुरुंगात मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहेत. २०१७ साली व्यावसायिक भागीदार तलाल महदीच्या हत्येप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर शरिया कायद्याअंतर्गत त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. नुकतीच १६ जुलै रोजी फाशी होण्याची शक्यता होती, मात्र १५ जुलै रोजी धार्मिक मध्यस्थांच्या हस्तक्षेपामुळे तात्पुरती स्थगिती देण्यात आली. मात्र अद्यापही फाशीची टांगती तलवार कायम आहे.
निमिषाच्या सुटकेसाठी तिचे कुटुंब, विशेषतः तिची आई आणि मुलगी, गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहेत. त्यांनी ‘ब्लड मनी’ म्हणजेच नुकसानभरपाई म्हणून मोठी रक्कम तलाल महदीच्या कुटुंबाला देण्याची तयारी दर्शवली होती. भारतातील विविध स्वयंसेवी संस्थांनी, नागरिकांनी आणि धार्मिक नेत्यांनी यासाठी निधी उभारला होता. जमात-ए-इस्लामी हिंद आणि इतर मुस्लिम नेत्यांनी देखील पीडित कुटुंबाला समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु आता तलाल महदीचा भाऊ अब्देफत्ताह महदी यांनी स्पष्टपणे माफी नाकारली आहे. “तिने माझ्या भावाचा निर्घृण खून केला आहे. ती फाशीची पात्र आहे. तिचे कुटुंब आमच्यावर दबाव टाकत आहे आणि तिचा गुन्हा झाकण्याचा प्रयत्न करत आहे,” असे वक्तव्य त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिले. त्यामुळे आता सर्व आशांचे दरवाजे बंद झाल्याचे चित्र आहे.
निमिषा ही केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असून एक नर्स आहे. ती वैद्यकीय सेवेसाठी येमेनमध्ये गेली होती. तेथे तिची ओळख तलाल महदी या स्थानिक व्यावसायिकाशी झाली. दोघांनी संयुक्तपणे वैद्यकीय क्लिनिक सुरू केले होते. मात्र, नंतर दोघांमध्ये आर्थिक वाद उभा राहिला. या वादातूनच हत्या घडल्याचा दावा येमेन प्रशासनाने केला.
भारत सरकारने अनेक वेळा राजनैतिक आणि कायदेशीर पातळीवर हस्तक्षेपाचे प्रयत्न केले. परराष्ट्र मंत्रालयाकडूनही यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. मात्र, येमेनमधील इस्लामिक शरिया कायद्यांतर्गत, पीडित कुटुंबच माफी देऊ शकते. न्यायालय किंवा सरकार या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे भारतीय सरकारच्या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App