विनायक ढेरे
गेल्या काही वर्षांमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विषयीची ऐतिहासिक उत्सुकता देशातच नव्हे, तर परदेशात प्रचंड वाढली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याची मुख्य कारणे कोणती?, याचा शोध ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे घेतला जात आहे आणि त्यामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा सिंहाचा वाटा असल्यास ऐतिहासिक सत्य एस्टॅब्लिश होत आहे. संशोधकांचे नेताजींच्या मृत्यू विषयीचे संशोधन देशव्यापी चर्चेचा विषय ठरले आहे. पण त्या पलिकडे जाऊन सुभाषबाबूंच्या नेतृत्वाचे विविध पैलू देखील उलगडले जात आहेत.
सुभाष बाबू – सावरकर
असाच एक पैलू सुभाष चंद्र बोस आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंधांचा आहे. गेल्या काही वर्षात सुभाष चंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संबंधांवर संशोधनात्मक पातळीवर बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. त्यांच्या भेटीचा ऐतिहासिक फोटो मेन स्ट्रीम मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मी उभारण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा होती हेही संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे.
लोकमान्य टिळक “बडा दादा”!!
परंतु, सुभाष बाबांचा हा महाराष्ट्राशी संबंध फक्त सावरकरांपुरता मर्यादित नाही तो त्यापलिकडे देखील आहे. सुभाष बाबूंच्या लेखनात लोकमान्य टिळकांचा उल्लेख “बडा दादा” असा अनेकदा आलेला आहे बंगालचे नेते बिपिन चंद्र पाल हे “छोटे दादा” तर लोकमान्य टिळक हे “बडे दादा”!! शिवाय सुभाष चंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्त्वावर छत्रपती शिवाजी महाराज यांची छाप देखील अमिट होती. शिवाजी महाराजांना महाराजांचा त्यांना झालेला परिचय हा प्रामुख्याने कलकत्त्यातला छत्रपती शिवाजी जयंती उत्सव आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या लिखाणातून होता.
महाराष्ट्र प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राशी सुभाष बाबूंचे अनोखे नाते होते. महाराष्ट्रातल्या सार्वजनिक कार्यक्रमात सुभाष बाबू पहिल्यांदा 1927 मध्ये आले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाष बाबू अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस होते. बाबू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली सुभाष बाबू काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण बळवंत भोपटकर हे प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि सावरकरांचे राजकीय गुरु शिवराम महादेव परांजपे हे देखील काँग्रेसमध्ये होते. या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात प्रांतिक परिषद भरवली होती आणि त्याचे अध्यक्षस्थान त्यांनी सुभाष बाबूंना दिले होते. (याच प्रांतिक परिषदेचा फोटो वर दिला आहे. यामध्ये त्या वेळचे महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते भारताचार्य चिं. वि. वैद्य, न. चिं. केळकर, मुंबई प्रांताचे नंतर पंतप्रधान झालेले बाळ गंगाधर खेर, वासू काका जोशी आदी दिसत आहेत.)
त्या अधिवेशनाला दोन दिवस सुभाष बाबू पुण्यामध्ये उपस्थित होते आणि त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि मध्य प्रांतातून प्रांतिक परिषदेचे प्रतिनिधी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिराच्या भव्य प्रांगणात आले होते. त्यानंतर सुभाष बाबू पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर इथल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. पुण्यामध्ये आल्यानंतर ते लक्ष्मण बळवंत भोपटकर यांच्या “बलवंत आश्रम” या हेरिटेज वास्तूमध्ये उतरत असत, असा ऐतिहासिक उल्लेख काळकर्ते शि. म. परांजपे यांच्या चरित्रात आढळतो.
Azadi Ka Amrit Mahostav : टिळक स्वराज्य फंड; आधुनिक भारताचा पहिला सीएसआर फंड; काढला कोणी?? योगदान दिले कोणी??
काँग्रेस सोडल्यानंतरही महाराष्ट्र दौरा
इतकेच नाही तर सुभाष बाबू यांनी 1938 मध्ये जेव्हा काँग्रेस सोडली आणि फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला, तेव्हा देखील त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यावेळी ते मुंबई, पुणे आणि नागपूरला आले होते. पुण्यात पुन्हा एकदा ते “बलवंत आश्रम” या भोपटकरांच्या निवासस्थानीच उतरले होते आणि फॉरवर्ड ब्लॉकच्या एक दिवसांच्या अधिवेशनासाठी ते पुण्यातल्या रस्त्यांवरून उघड्या मोटारीने मिरवणुकीने टिळक स्मारक मंदिरात गेले होते. याच महाराष्ट्र दौऱ्यात सुभाष बाबूंची सावरकरांची एक गुप्त भेट झाली होती. त्यानंतर सावरकरांची आणि सुभाष बाबूंची भेट सावरकरांच्या स्वागत समारंभात मुंबईतल्या सरदार गृहात झाली होती. या ऐतिहासिक भेटीचा फोटो त्यावेळचे मुंबई प्रांताचे अर्थमंत्री जमनादास मेहता यांच्या चरित्रात आढळतो. त्यावेळी केसरी मराठा संस्थेने सुभाष बाबू आणि सावरकरांच्या सन्मानार्थ सरदार गृहामध्ये चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुंबई प्रांताचे अर्थमंत्री जमनादास मेहता यांच्याबरोबरच मुंबईचे त्यावेळचे नेते के. एफ. नरिमन आणि अन्य नेते उपस्थित होते. त्यानंतर 22 जून 1940 रोजी सुभाष बाबू हे सावरकरांना त्यांचे मुंबईतले निवासस्थान सावरकर सदन येथे येऊन भेटले होते. सावरकर भेटीच्या आधी सुभाष बाबूंनी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांची जिना हाऊस मध्ये जाऊन भेट घेतली होती.
सुभाष बाबू – सेनापती बापट संबंध
सावरकरांचे अनुयायी मित्र सेनापती बापट यांचे देखील सुभाषबाबूंचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. किंबहुना सेनापती बापट हे सुभाष बापूंच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे महाराष्ट्र प्रांतिक कमिटीचे अध्यक्ष होते. सुभाष बाबू भारतात असताना सेनापती बापटांनी फॉरवर्ड ब्लॉकच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्र प्रांताचा दौरा देखील काढला होता.
सुभाष बाबू – ना. भा. खरे संबंध!!
मध्य प्रांताचे पंतप्रधान नारायण भास्कर खरे यांचे देखील सुभाष बाबूंची अतिशय निकटचे संबंध होते. हेच ते खरे आहेत, की जे सुभाष बाबू आपल्या घरातून नाहीसे होऊन अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांना भेटलेले अखेरचे महत्त्वाचे नेते होते. याचा उल्लेख स्वतः खरे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
Azadi Ka Amrit Mahostav : 1942 चले जाव आंदोलन : जनजागृतीत यशस्वी, पण परिणामतः अयशस्वी!!; हे अगदी गांधीवाद्यांचेही म्हणणे!!
आझाद हिंद फौज आणि महाराष्ट्र!!
सुभाष बाबूंनी त्यांची आजाद हिंद सेना स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर त्या फौजेमध्ये अनेक मराठी तरुण परदेशात जाऊन सावरकरांच्या प्रेरणेतून त्या फौजेत सहभागी झाले होते. पुण्यातल्या टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळाचे संस्थापक कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी देखील सावरकरांच्या सैन्य भरतीला प्रतिसाद देत अनेक तरुणांची सैन्यात भरती केली होती आणि ते तरुण नंतर सुभाष बाबू यांच्या आझाद हिंद फौजेच सहभागी झाले होते. जनरल जगन्नाथराव भोसले हे तर सुभाष भाऊंचे उजव्या हात मानले जात होते. त्याचबरोबर इतिहास संशोधक पु. ना. ओक हे काही काळ सुभाष बाबूंचे पीए होते.
अनेक संदर्भ अजून अप्रकाशित
आझाद हिंद फौज आणि महाराष्ट्र हा तर मोठ्या संशोधनाचा आणि ग्रंथ लिखाणाचा विषय आहे. कारण अनेक मराठी तरुण त्यावेळी सुभाष बाबांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाले होते आणि वेगवेगळ्या मार्गाने सुभाष बाबांची सुभाष बाबांच्या राजकीय कार्याशी संलग्न होत होते हे अनेक ऐतिहासिक संदर्भ अजून प्रकाशात यावयाचे आहेत. ते संशोधकांची वाट पाहत आहेत!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App