नेहरू विरुद्ध मोदी : दोघांचीही “कामराज योजना”च, पण गुणात्मक फरक किती तो पहा!!

2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्र्यांशी काल साडेपाच तास विचार विनिमय करून या निवडणुकीसाठी केंद्र सरकारमधून मोकळीक देऊन पक्ष संघटनेसाठी काम करण्याचे सूचित केले. याचा संबंध मंत्रिमंडळातल्या फेरबदलाशी निश्चितच आहे, पण आता मोदींच्या या राजकीय खेळीवर अनेकांनी मोदींची “कामराज योजना” म्हणून टीका टिपण्णी केली आहे. मोदींवर टीका करायला अनेकांना अनेक मुद्दे सापडतात. पण ते मुद्दे राजकीय चलनी नाणे असले तरी, ते योग्य किंवा चपखल बसतातच, असे अजिबात नाही. मोदींवर होत असलेल्या कामराज योजनेच्या टीका टिपण्णीसंदर्भात देखील तसेच म्हणता येईल. यासाठी ही “कामराज योजना” होती तरी काय??, हे नेमकेपणाने समजून घेतले पाहिजे. Nehru v/s Modi : both implemented “kamraj plan”, but with quality difference

ही “कामराज योजना” भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1963 मध्ये अंमलात आणली होती. त्यावेळी काँग्रेस देशातला सर्वांत बलाढ्य पक्ष होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस पक्ष सत्तेवर येऊन 15 वर्षे उलटून गेली होती त्यामुळे काँग्रेसमध्ये आता मरगळ आली आहे, असे सांगून पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्यावेळी आपल्याला “पॉलिटिकली चॅलेंज” ठरणारे म्हणजेच राजकीय आव्हान देणारे नेते मंत्रिमंडळातून खड्यासारखे बाजूला करण्यासाठी त्यावेळचे काँग्रेस अध्यक्ष के. कामराज यांच्याकरवी विशिष्ट योजना आखली. वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसच्या संघटनात्मक कार्यात सहभागी व्हावे. काँग्रेस संघटना मजबूत करावी, असे गोड गुलाबी नाव त्या योजनेला दिले. हीच ती “कामराज योजना”!!

या कामराज योजनेतून पंतप्रधान पंडित नेहरूंनी मोरारजी देसाई या सर्वांत कठोर आव्हान वीर मंत्र्याला अलगदपणे मंत्रिमंडळातून वगळले. पण त्यांना नंतर कोणतेही काँग्रेस संघटनेचे काम दिले नाही. पण ही “कामराज योजना” यासाठी प्रचंड गाजली, की पंडित नेहरूंच्या मनात आपल्या सहकाऱ्यांविषयी किती भीती आणि अविश्वास आहे, हेच यातून दिसले. नेहरूंची प्रतिमा उदारमतवादी, लोकशाहीवादी अशी त्यावेळी देखील अनेक जण रंगवत असत. पण कामराज योजनेतून नेहरूंच्या त्या प्रतिमेला तडा गेला होता. आपल्याच मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांच्या खुर्ची खाली अस्थिरतेचा बॉम्ब ठेवून त्यांना “सरळ” करण्याचा मार्ग पंडित नेहरूंनी पत्करला होता. त्यावेळी केवळ व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरेंनी कामराज योजनेचे अप्रतिम व्यंगचित्र रेखाटले होते कामराज हे यमराज रूपात दाखवून ते त्यांच्या कामराज योजनेचा रेडा घेऊन आले आहेत आणि अनेक केंद्रीय मंत्री धारातीर्थी पडले आहेत, असे ते व्यंगचित्र होते.

त्याखेरीज इंदिरा गांधींचे प्यादे राजकीय बुद्धिबळाच्या पटावर पुढे सरकवण्याचाही अंत:स्थ हेतू होता!! पण आपण स्वतःच आपल्या मुलीला “प्रमोट” करतो आहोत, असे दाखवणे नेहरूंना सोयीचे वाटले नव्हते. म्हणून त्यांनी कामराज योजनेच्या माध्यमातून ते साध्य करून घेतले.

मोदींची कथित कामराज योजना

पण नेहरूंची “कामराज योजना” आणि मोदींची कथित “कामराज योजना” यात गुणात्मक अंतर आहे. मोदींनी आखलेल्या कामराज योजनेत केंद्रीय मंत्र्यांना भाजप संघटनेचे काम देणे, हा भाग निश्चित आहे. यात कोणतीही शंका नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काटा काळजी घेण्यासाठी मोदी अनेक केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती देखील करतील. पण त्या पलीकडे जाऊन सर्वांत महत्त्वाचा गुणात्मक फरक हा आहे, की यापैकी कोणत्याही केंद्रीय मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजिबात आव्हान दिलेले नाही. तशी भाषा वापरलेली नाही. किंबहुना मोदी सांगतील तीच पूर्व अशी सर्व केंद्रीय मंत्र्यांचे आणि भाजप संघटनेची मनापासून भूमिका आहे. मोदी आज त्यांचे निर्विवाद नेते आहेत.

 मंत्रिमंडळ आणि संघटना समांतर

कारण 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकायची असेल, तर एकाच वेळी केंद्रीय मंत्रिमंडळाचे वेगवेगळे निर्णय आणि योजना तळागाळात पोचवायच्या असतील, तर सक्षम मंत्रिमंडळ आणि त्याचवेळी सक्षम पक्ष संघटना हे समांतर चालले पाहिजे. मोदींना नेमके हेच साध्य करायचे आहे आणि यासाठीच त्यांनी स्वतःची “कामराज योजना” आखली आहे. भले मोदींवर कामराज योजनेची टीका टिप्पणी होत असेल, पण मोदी असल्या टीकेला भीक घालणारे नेते नाहीत. कुठल्याच केंद्रीय मंत्र्याचे अथवा भाजप संघटनेतल्या नेत्याचे आपल्याला आव्हान नाही हे मोदींना पक्के ठावूक आहे. त्यामुळे स्वतःवरच्या आव्हानाला परतवून लावण्यासाठी मोदींनी ही “कामराज योजना” मूळात आखलेलीच नाही, तर 2024 च काय पण 2026 नंतर मतदारसंघाच्या फेररचनेत मतदारसंघाची होणारी प्रचंड वाढ, लोकप्रतिनिधींची होणारी प्रचंड वाढ या दृष्टीने भाजप संघटना बांधणे ही मोदींची “टॉप प्रायोरिटी” आहे. त्या दृष्टीनेच मोदी संघटनात्मक पातळीवर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या कामाला लागले आहेत. मोदींच्या कामराज योजनेचे विश्लेषण करायचे असेल, तर वर उल्लेख केलेल्या मुद्द्याच्या आधारेच करावे लागेल. अन्यथा तो नुसताच फाफटपसारा ठरेल.

मोदींपुढे असणारे आत्ताचे आव्हान किंवा मोदींना मिळणारे संभाव्य आव्हान हे त्यांच्या वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेला नसून, ते खऱ्या अर्थाने भाजप संघटना वाढीचे, विस्ताराचे आणि समाजात खोलवर रुजवण्याचे आहे. मोदींची “कामराज योजना” असलीच, तर ती फक्त आणि फक्त यासाठीच आहे. पंडित नेहरूंना जसे आव्हान मिळाले होते, तसे आव्हान मोदींना मिळालेले नाही आणि त्यासाठी मोदींची “कामराज योजना” नाही हेच यातून स्पष्ट होते!!

Nehru v/s Modi : both implemented “kamraj plan”, but with quality difference

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात