विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरातल्या महिला अत्याचार प्रकरणांची दखल घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई करणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाने उल्लू ॲप मधल्या हाऊस अरेस्ट शो मधल्या अश्लील कंटेंटची गंभीर दखल घेऊन त्या शोचा होस्ट एजाज खान आणि उल्लू ॲपचा सीईओ विभू आगरवाल या दोघांना राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. येत्या 9 मे रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सुनावणीला सामोरे जावे, असे स्पष्ट आदेश या दोघांना काढले असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांनी उचलले आहे.
उल्लू ॲप मध्ये अनेक अश्लील कंटेंट दाखविले गेले. त्याविषयी प्रसार माध्यमांमध्ये आणि अन्य समाज माध्यमांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या अश्लील कंटेंटच्या विरोधात अनेकांनी वेगवेगळ्या तपास संस्थाकडे तक्रारी दाखल केल्या.
या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या हाऊस अरेस्ट नावाच्या शोमध्ये होस्ट एजाज खान याने कॅमेरासमोर काही महिलांना अश्लील पोज द्यायला लावल्या. त्या महिला अस्वस्थ झाल्या, तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि काही इंटिमेट पोजेस मुद्दामून द्यायला लावल्या. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. या सगळ्या घटनेची दखल घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने एजाज खान आणि उल्लू ॲपचा सीईओ विभू आगरवाल या दोघांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या सुनावणीला सामोरे जाण्याची नोटीस बजावली. भारतीय न्याय संहिता 2023 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा 2000 यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे.
याआधी सोशल मीडियाद्वारे असाच अश्लील कंटेंट पसरवल्याबद्दल रणवीर अलाहाबादिया आणि अन्य पाच जणांविरुद्ध राष्ट्रीय महिला आयोगाने कठोर कायदेशीर कारवाई केली होती त्यांना नोटिसा बजावून महिला आयोगाच्या सुनावणीला सामोरे जायला लागले होते. आता तशाच प्रकारे उल्लू ॲप मध्ये अश्लील कंटेंट दाखविल्याबद्दल दोघांना महिला आयोगाच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App