विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो लाईनवर उभे राहून आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरच पेट्रोल फेकले. त्यामुळे पक्षावरच कठोर कारवाईची शक्यता निर्माण होताच आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पक्षातून हाकलून देऊन पवारांच्या पक्षाने हात झटकून टाकले. NCP SP
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातल्या कसब्यातले कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेट्रोच्या लाईनवर उभे राहून आज दुपारी आंदोलन केले. बेरोजगारीच्या विरोधात हे आंदोलन असल्याचे सांगितले गेले, पण त्यामुळे चार मार्गांवरच्या मेट्रोंचा खोळंबा झाला. मेट्रो मधील प्रवाशांना अलीकडच्या स्थानकांवर उतरवून इतर वाहनांनी प्रवास करावा लागला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात सुरुवातीला कोणताच खुलासा केला नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो लाईनवर उभे राहून आंदोलन केले, त्यामुळे प्रवाशांची अडवणूक झाली हे उघड झाले त्यामुळे पुणेकरांचा संताप आणखीनच वाढला.
त्यातच नरेंद्र पावटेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या अंगावर पेट्रोल फेकले. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना फटकावत मेट्रोच्या लाईन वरून बाजूला काढले. या सगळ्यांमध्ये दीड ते दोन तास गेले. मेट्रोचा खोळांबा झाला.
आपल्या पक्षाविरुद्ध हा संताप वाढत चाललेला पाहताच पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नरेंद्र पावटेकर आणि त्यांच्याबरोबर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताबडतोब पक्षातून हाकलून दिले आणि संबंधित आंदोलनापासून हात झटकले. नरेंद्र पावटेकर आणि त्यांचे कार्यकर्ते तीनच महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले. त्यांनी आमच्या पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमांमध्ये भाग घेतला नाही. आजही आंदोलन करताना पक्षाची परवानगी घेतली नाही म्हणून या सगळ्यांना पक्षातून हाकलून देत असल्याचा खुलासा प्रशांत जगताप यांनी केला.
पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर देखील नरेंद्र पावटेकर आणि त्यांचे कार्यकर्ते गप्प बसले नाहीत उलट प्रशांत जगताप यांच्यासारखे नेतेच आम्हाला पुढे येऊ देत नाहीत असा आरोप पावटेकर यांनी केला. त्यामुळे आंदोलन राहिले बाजूला, पवारांच्या पक्षातल्याच गटबाजीने पेट घेतला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App