विशेष प्रतिनिधी
मुंबई : Navnath Ban भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केले आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्याचा निषेध करणारे राऊत, बंगालमध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या वेळी गप्प का होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.Navnath Ban
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले, “आज संजय राऊत यांना अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. मात्र पश्चिम बंगालमध्ये अनेक भाजप कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, काहींची हत्या झाली, तेव्हा त्यांनी कधीही आवाज उठवला नाही.”Navnath Ban
‘बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले’
नवनाथ बन यांनी आरोप केला की, ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अनेक हल्ले झाले.
“त्या काळात अनेक हिंदू माता-भगिनींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या. अनेक कार्यकर्त्यांना जीव गमवावा लागला. मात्र त्यावेळी संजय राऊत यांनी एकही शब्द काढला नाही,” असा आरोप त्यांनी केला.
‘हल्ल्याचे समर्थन नाही, पण जनतेचा संदेश स्पष्ट’
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्याचा उल्लेख करताना बन म्हणाले, “आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही. मात्र पश्चिम बंगालमधील जनतेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा एक राजकीय संदेश आहे, हे राऊतांनी समजून घेतले पाहिजे.”
‘राऊतांचे काम फक्त थट्टा-मस्करी’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या रेल्वे प्रवासावरून करण्यात आलेल्या टीकेलाही बन यांनी प्रत्युत्तर दिले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस सामान्य नागरिकांप्रमाणे रेल्वेने प्रवास करत आहेत. राऊत प्रत्येक गोष्टीत थट्टा-मस्करी शोधतात. जनतेनेच त्यांच्या या राजकारणाची खिल्ली उडवली आहे,” असे ते म्हणाले.
‘प्राजक्त तनपुरे जनतेतून निवडून आलेले नेते’
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे माजी नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावरूनही बन यांनी संजय राऊतांना लक्ष्य केले.
“प्राजक्त तनपुरे हे जनतेतून निवडून आलेले नेते आहेत. ते मागच्या दाराने सभागृहात जाणारे नेते नाहीत. स्वतःच्या पक्षात काय चालले आहे, याकडे आधी लक्ष द्या,” असा टोला त्यांनी लगावला.
‘ऑपरेशन सिंदूर २ वरून राऊत अस्वस्थ’
भारतीय सैन्याच्या संभाव्य ‘ऑपरेशन सिंदूर २’ संदर्भातील चर्चेवरूनही नवनाथ बन यांनी राऊतांवर टीका केली.
“जेव्हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांविरोधात कारवाईची चर्चा होते, तेव्हा संजय राऊत अस्वस्थ होतात. ऑपरेशन सिंदूरच्या वेळीही त्यांनी सैन्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे सरकारचा नव्हे तर भारतीय सैन्याचा अपमान आहे,” असा आरोप त्यांनी केला.
Sympathy for Abhishek Banerjee, But Why Silence on Bengal Violence?: BJP’s Navnath Ban Attacks Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!
- शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा
- Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई
- Pune-Pimpri : पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर; एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली