राष्ट्रवादी – तृणमूळ – कम्युनिस्ट : संकुचित दृष्टी, आकुंचित पक्ष; राष्ट्रीय दर्जापासून ढळले नेतृत्व!!


विशेष प्रतिनिधी

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी या राजकीय पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला. या निर्णयाचे भविष्यातले राजकीय परिणाम काय व्हायचे ते होवोत, पण जेव्हा या निर्णयाकडे मूलभूत राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर जे लक्षात येते, तेच शीर्षक इथे दिले आहे.National status of NCP, TMC withdrawn, BRS lost state party status, due to short sighted leaders with low ambitions

संकुचित दृष्टी आकुंचित पक्ष राष्ट्रीय दर्जा पासून ढळले नेतृत्व!!, हे इथे मान्य करावेच लागेल. विशेषतः वर उल्लेख केलेल्या सर्व पक्षांच्या मुख्य नेत्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा नेमकेपणाने अभ्यासपूर्ण आढावा घेतला, तर हे निश्चित लक्षात येईल, की त्यांची राजकीय दृष्टी संकुचित आहे आणि त्यामुळेच त्यांचे पक्ष आकुंचन पावले आणि राष्ट्रीय दर्जा पासून त्यांचे नेतृत्व ढळले!! अर्थात भारतीय कम्युनिस्ट पार्टी याला अपवाद ठरू शकेल, पण तो फक्त राजकीय तत्त्वज्ञानाच्या पातळीवर, निवडणूक आयोगाच्या निकषांवर नव्हे!!

पण राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूळ काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, भारत राष्ट्र समिती या पक्षांचे मुख्य नेते शरद पवार, ममता बॅनर्जी आणि केसीआर चंद्रशेखर राव या चारही नेत्यांचे राजकीय नेतृत्व आणि कर्तृत्व नीट तपासून पाहिले, तर आपापल्या राजकीय प्रदेशांपलिकडे कधी त्यांनी झेप घेतलेलीच नव्हती हे स्पष्ट दिसते. आपापले राजकीय बालेकिल्ले टिकवून धरणे आणि आपापल्या मर्यादित महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेणे हेच त्यांचे राजकीय कर्तृत्व दिसते.


पवारांनी जेपीसी निरुपयोगी म्हटल्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया, यावर राष्ट्रवादी प्रमुख सोडून 19 पक्षांचे एकमत, वाचा पवारांचे टॉप 7 मुद्दे


बाकींच्यापेक्षा जास्त संधी पवारांनी गमावल्या

वास्तविक शरद पवारांना गेल्या 55 वर्षाच्या त्यांच्या संसदीय कारकीर्दीत अनेकदा उत्तुंग झेप घेण्याची संधी आली होती. अगदी 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्यानंतर ते थेट पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरलेही होते. पण नरसिंह रावांच्या खऱ्या चाणक्यगिरी पुढे त्यांचे काही चालले नाही आणि त्यांना त्या शर्यतीतून माघार घ्यावी लागली. शरद पवारांनी नरसिंह राव यांना आव्हान देण्यापेक्षा त्यांच्याशी जर राजकीय दृष्ट्या जुळवून घेतले असते आणि ते त्यांचे विश्वासार्ह राजकीय वारस बनले असते, तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसची आजची अवस्था या स्वरूपाची म्हणजे राष्ट्रीय दर्जा घसरून प्रादेशिक पक्षाची आली नसती. {इथे “विश्वासार्ह” हा शब्द फार महत्वाचा आहे}

वास्तविक नरसिंह राव आणि पवार हा संबंध राष्ट्रवादीच्या प्रादेशिक दर्जाची जोडणे हा कोणाला बादरायणी संबंध वाटू शकतो. पण ते तसे नाही. वास्तविक नरसिंह राव हे देखील गांधी परिवाराची इच्छा बाजूला सारून त्यांना आव्हान देऊन स्वकर्तृत्वावर पंतप्रधान बनले होते. त्यांचे राजकीय ज्येष्ठत्व मान्य करून पवारांनी त्यांचे अनुयायित्व पत्करायला काहीच हरकत नव्हती. पण पवारांनी तेव्हा ते केले नाही. स्वबळावर त्यांनी अतिरिक्त विश्वास ठेवला आणि तिथेच नरसिंह राव श्रेष्ठ ठरून पवारांचा पराभव झाला. पण या पराभवापेक्षा नरसिंह रावांचा विश्वास ते कमवू शकले नाहीत, इथे पवारांच्या राजकीय घसरणीची सुरुवात आहे.

पवारांना 1999 मध्ये दुसरी संधी

पवारांना ही राजकीय घसरण रोखण्याची संधी 1999 मध्ये पुन्हा प्राप्त झाली होती. त्यांच्या समवेत तारिक अनवर आणि पी. ए. संगमा यांच्यासारखे बिहार आणि मेघालयातले दोन दिग्गज नेते सोनिया गांधीं विरुद्ध बंड करून उभे राहिले होते. त्यावेळी पवारांनी काँग्रेसशी तडजोड न करता स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये जाऊन आणि खपून केली असती, तर त्यांना खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवरचा प्रतिसाद देखील मिळाला असता. त्यासाठी फार नव्हे 5 ते 7 वर्षे कदाचित द्यावी लागली असती. पण पवारांनी ही 5 ते 7 वर्षे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणी साठी देण्याऐवजी 1999 च्या विधानसभा निवडणुकीतच सोनिया गांधींची तडजोड केली. महाराष्ट्रातल्या सत्तेतला वाटा मिळवला आणि तो 2014 पर्यंत टिकवला. पण हे करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय अधिमान्यता मिळवण्याची संधी कायमची गमावली.

शरद पवार कोणत्याही कोलांटउड्या मारायला मागे पुढे पाहत नाहीत, हे त्यांनी 1999 पासून सिद्ध केले. शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्वाविषयी कोणालाही शंका नाही. पण त्यांच्या विश्वासार्हतेविषयी प्रत्येकाला शंका आहे हे त्यांच्या कारकिर्दीतले सगळ्यात मोठे नकारात्मक वैशिष्ट्य आहे!!

राष्ट्रवादी संघटना म्हणून खुरटली

त्यामुळे मोठी संधी आणि 5 ते 7 वर्षांचे कष्ट करण्याची क्षमता असूनही पवारांनी ते केले नाही. तिथेच पुन्हा एकदा राजकीय पक्षाची संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण झाली. 2014 नंतर प्रबळ विरोधी पक्ष म्हणून वावरण्यापेक्षा पवारांनी भाजपचीच जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. भले 2019 मध्ये अडीच वर्षांसाठी त्यांनी उद्धव ठाकरेंना घोड्यावर बसून महाराष्ट्रात सत्तेचा वाटा पुन्हा मिळवला असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर उंचावण्यावर त्यांनी कधीही भर दिला नाही.

महाराष्ट्रातल्या सत्तेच्या वाट्यापलिकडे पवारांनी कधी दृष्टीच ठेवली नाही, हा त्यांच्या कारकिर्दीतला सगळ्यात मोठा अयब आहे आणि त्याचेच फळ निवडणूक आयोगाने आज अधिकृतरित्या पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात घातले आहे.

केवळ मराठी माध्यमे त्यांना आता राष्ट्रीय नेते म्हणतात अन्य कोणीही नाही. अशी अवस्था संकुचित दृष्टी आणि आकुंचित पक्ष यामुळे त्यांनी ओढवून घेतल्याचे दिसत आहे.

ममता, चंद्रशेखर राव

जे पवारांचे तेच ममता बॅनर्जी, केसीआर चंद्रशेखर राव यांचे आहे. आपापल्या प्रादेशिक मर्यादा ओलांडून मोठी झेप घेण्यासाठी जी राष्ट्रीय पातळीवरची खरी दृष्टी लागते तिचा ह्या सर्व नेत्यांमध्ये आभाव आहे. काँग्रेसची हायकमांड आणि भाजपचे वरिष्ठ नेतृत्व यांच्यामध्ये जी राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाची दृष्टी दिसते ती कोणत्याच पातळीवर पवार, ममता, चंद्रशेखर राव यांच्याकडे दिसत नाही. आपापले बालेकिल्ले जपून तिथल्या सत्तेतले वाटे टिकवून जमले तर बाहेरच्या राज्यात जाऊ ही या नेत्यांची राजकीय दृष्टी आणि कर्तृत्व आहे. आपापल्या राज्यांमध्ये भले या सर्व नेत्यांनी काँग्रेसचा पराभव केला असेल, काँग्रेस पक्षाला बॅकफूटवर ढकलले असेल, पण म्हणून या नेत्यांनी काँग्रेसचे केलेले नुकसान हे राष्ट्रीय पातळीवर या सर्व नेत्यांच्या पक्षांचे लाभ यामध्ये कन्व्हर्ट झालेले नाहीत आणि इथेच काँग्रेस हायकमांड आणि पवार, ममता, चंद्रशेखर राव यांच्यातल्या नेतृत्व शैलीचा फरक दिसतो.

काँग्रेस कितीही शक्तीहीन झाली, संघटनात्मक पातळीवर आकुंचित पावली तरी तो राष्ट्रीय पक्ष आहे हे विसरता येणार नाही आणि भाजपचे जरी सुरुवातीला 2 खासदार असले तरी त्यांच्या केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाची म्हणजे वाजपेयी – अडवाणींची राजकीय दृष्टी ही राष्ट्रीय पातळीवरची होती हेही विसरता येणार नाही.

भाजपच्या नेत्यांचे जीवतोड मेहनत

इंदिराजांच्या हत्येनंतर 1985 मध्ये झालेल्या लोकसभा झालेल्या निवडणुकीत भाजपचे दोन खासदार निवडून आले. पण त्यानंतर 1989 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे 86 खासदार निवडून आले होते, हा चमत्कार नव्हता, तर वाजपेयी – अडवाणींनी घेतलेल्या मेहनतीचा तो परिणाम होता. तशी मेहनत कोणत्याही प्रादेशिक नेत्याने आपल्या प्रदेशाबाहेर जाऊन घेतल्याचे दिसत नाही. इथेच कोणत्याही राजकीय पक्षाचा राष्ट्रीय नेतृत्वाच्या राजकीय कर्तृत्वातला आणि प्रादेशिक नेतृत्वाच्या राजकीय कर्तृत्वातला मुख्य भेद दिसतो.

शरद पवार, ममता बॅनर्जी, आणि के. चंद्रशेखर राव यांचे पक्ष राष्ट्रीय नसल्याचा “रिझल्ट” लागला आहे. पण मूळात या नेत्यांचे पक्ष राष्ट्रीय दर्जाच्या “एन्ट्रन्स टेस्टलाच” बसण्यासाठी “एलिजिबल” नव्हते ही वस्तुस्थिती आहे!!

National status of NCP, TMC withdrawn, BRS lost state party status, due to short sighted leaders with low ambitions

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात