विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत छोट्या पक्षांकडून मदत घेऊन प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत त्यांना मदत करण्याऐवजी त्यांची वाट लावण्याचा प्रकार महाविकास आघाडीत घडतो आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांची ( jayant patil )वाट लावली. आता ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम मास्तर यांना कात्रजचा घाट दाखविण्याच्या बेतात आहेत.
विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 12 आमदारांच्या बळावर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना विधान परिषदेत निवडून आणण्याची लालूच दाखविली. परंतु, प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंनी आपले सचिव मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषद निवडणुकीत उभे करून निवडून आणले. पवार महाविकास आघाडीची सगळी मते देऊन जयंत पाटलांना विधान परिषदेवर निवडून आणू शकले नाहीत. महाविकास आघाडीने जयंत पाटलांचा विश्वासघातच केला.
आता त्या पलीकडे जाऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसैय्या आडम मास्तर यांच्याकडे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत मदत मागितली. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मदत केली. प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या, पण आता जेव्हा आडम मास्तर यांचा हक्काचा सोलापूर शहर मध्य मतदारसंघ विधानसभेसाठी सोडायचा म्हटल्यावर काँग्रेस नेत्यांच्या पोटात दुखू लागले. काँग्रेस नेत्यांनी हा मतदारसंघ आडम मास्तरांसाठी सोडू नये, असा वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुशील कुमार शिंदे, सोनिया गांधी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यात चर्चा झाल्याची आठवण आडम मास्तरांनी काँग्रेस नेत्यांना करून दिली. परंतु त्यावर सुशील कुमार शिंदे यांच्या सकट काँग्रेस नेत्यांनी मौन धारण केले.
शेतकरी कामगार पक्ष असो की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असो या छोट्या पक्षांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत केली. परंतु, विधानसभेत त्याची परतफेड करायची वेळ आली, तेव्हा मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी छोट्या पक्षाच्या नेत्यांचा विश्वासघात करणे चालवण्याचे दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more