बिहार विधानसभा निवडणूक यांचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणातून जे मोठे राजकीय भाकीत वर्तविले, ते काँग्रेस फुटीचे आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून काँग्रेसच्या सध्याच्या आमदारांच्या विरोधात काँग्रेस मधले नेते आणि कार्यकर्ते बंडखोरी करायच्या तयारीत आहेत. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सध्याच्या नामदारांचे नेतृत्व मान्य नाही कारण सध्याच्या नामदारांनी मूळ काँग्रेसची “मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस” करून टाकली आहे, अशी खिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उडवली. त्यापुढे जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडेल, असे भाकीत केले.Modi playing “Indira Game” to split Congress
मोदींनी सलग दोनदा केलेल्या या वक्तव्यातून बाकी कुठला नाही पण “इंदिरा पाचर” प्रयोग काँग्रेसवर केला. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यासाठी इंदिरा गांधींचा राजकीय – बौद्धिक आश्रय घ्यावा लागला. कारण मोदी ज्या राजकीय – बौद्धिक परंपरेतून येतात, त्या संघ परिवारात आणि भाजपमध्ये सुद्धा “इंदिरा पाचर” प्रयोग करण्याइतपत कधी राजकीय ताकद नव्हती आणि राजकीय बुद्धिमत्ता सुद्धा नव्हती. म्हणूनच सत्ता दृढ झाल्यानंतर मोदींना इंदिरा गांधींचा राजकीय बौद्धिक आश्रय घेऊन काँग्रेसवर “इंदिरा पाचर” प्रयोग करावा लागतोय.
काय आहे “इंदिरा पाचर” प्रयोग??
स्वतःची सत्ता टिकवण्यात इंदिरा गांधी या देशातल्या सगळ्या राजकारणी पुरुषांच्या वरच्या “पुरुष” होत्या. इंदिरा गांधींनी त्यासाठी काँग्रेसच दोनदा फोडली. 1969 आणि 1978 या दोन वर्षांमध्ये इंदिरा गांधींनी काँग्रेस मधल्या दुढ्ढाचार्यांना “सरळ” करून स्वतःचे राजकीय वर्चस्व निर्माण केले. त्यांनी काँग्रेस फोडून यशवंतराव चव्हाण, बाबू जगजीवन राम, मोरारजी देसाई, निजलिंगप्पा, नीलम संजीव रेड्डी या नेत्यांचे वर्चस्व मोडून काढले. मोरारजी देसाई वगळता या सगळ्या नेत्यांना इंदिरा गांधींचा करिष्मा तर हवा होता कारण निवडणुका जिंकायच्या होत्या पण इंदिरा गांधींचे राजकीय वर्चस्व त्यांना सहन होत नव्हते त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये लोकशाही नाही अशी हाकाटी पिटली होती. इंदिरा गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व करावे पण पक्षात “लोकशाही” आणावी आणि आम्हाला विचारावे असा त्यांचा आग्रह होता. परंतु, प्रत्यक्षात या सगळ्या नेत्यांचा इंदिरा गांधींना सुप्त विरोध होता. या सगळ्या नेत्यांना इंदिरा गांधींचे नेतृत्व झुगारून द्यायचे होते. पण तेवढी ताकद त्यांच्यात नव्हती. इंदिरा गांधींशी संघर्ष करून स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याची यापैकी कोणाही मध्ये क्षमता नव्हती. इंदिरा गांधींशी त्यांचे मतभेद होतेच, पण त्यांचे एकमेकांशी सुद्धा कधी पटत नव्हते. त्यामुळे इंदिरा गांधींनी 1969 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भी गिरी यांना बंडखोरी करायला लावून काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि आपले वर्चस्व निर्माण केले.
चड्डी काँग्रेसचा प्रयोग फसला
1978 मध्ये इंदिरा गांधी सत्तेवर नव्हत्या. त्या पराभूत झाल्या होत्या. त्यावेळी सुद्धा काँग्रेसमधल्या दुधाचाऱ्यांनी इंदिरा गांधीं विरुद्ध बंड करून वेगळी चव्हाण + रेड्डी काँग्रेस काढली होती. लोक तिला “चड्डी काँग्रेस” म्हणत. यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी या काँग्रेसचे नेतृत्व केले होते. पण “चड्डी काँग्रेसचा” प्रयोग 1980 मध्ये फसला. यशवंतराव आणि रेड्डी या दोन्ही लोकांना इंदिरा गांधींपुढे शरणागती पत्करावी लागली.
जनता पक्षावर “इंदिरा पाचर” प्रयोग
पण याच दरम्यान इंदिरा गांधींनी काँग्रेस बरोबर जनता पक्षात सुद्धा पाचर प्रयोग केला होता. इंदिरा गांधींना अटक करण्याच्या मुद्द्यावरून जनता पक्षात मोरारजी देसाई विरुद्ध चरणसिंह विरुद्ध बाबू जगजीवन राम असा संघर्ष पेटला होता. खरं म्हणजे तो संघर्ष जनता पक्षाच्या जन्मापासूनच होता. कारण जनता पक्षात मोरारजी देसाई यांचे नेतृत्व कोणालाच मान्य नव्हते. बाबू जगजीवन राम आणि चरण सिंह या दोघांनाही पंतप्रधान व्हायचे होते. जयप्रकाश नारायण यांनी कसेबसे करून मोरारजी देसाई त्यांना पंतप्रधान केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला चरणसिंह आणि बाबू जगजीवन राम यांना भाग पाडले होते. पण जनता पक्षात या दोघांनी मनापासून कधीच काम केले नाही. या दोघांच्याही महत्त्वाकांक्षा नेहमीच उसळत राहिल्या.
जगजीवन राम यांना गंडवले
इंदिरा गांधींनी नेमका हाच मुद्दा राजकीय दृष्टीने हेरला आणि त्यांनी जनता पक्षात मोठी पाचर मारली. त्यांनी चरण सिंह यांच्याशी आतून संधान बांधले. त्यांना जनता पक्षातून बाहेर पडून स्वतःचा जनता पक्ष सेक्युलर हा पक्ष काढण्यासाठी प्रवृत्त केले. त्याचवेळी त्यांनी जाहीरपणे जगजीवन राम यांच्या नेतृत्वाची स्तुती करायला सुरुवात केली. जनता पक्षात फूट पडली तर काँग्रेस जगजीवन राम यांना पाठिंबा देऊ शकते असे वेगवेगळ्या पद्धतीने सुचित करायला सुरुवात केली. त्यामुळे राजकारणात मुरब्बी असलेले चरण सिंह आणि जगजीवन राम हे दोन्ही नेते इंदिरा गांधींचा पाठिंबा मिळवण्यासाठी लालचावले. या दोघांनाही आपापल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची आशा आणि अपेक्षा वाटायला लागली. त्यामुळे इंदिरा गांधींची जुने वैर विसरून दोघेही इंदिरा गांधींकडून पाठिंब्याची अपेक्षा करायला लागले. दोघांनी आपापले वेगळे गट तयार केले आणि जनता पक्षात खऱ्या अर्थाने मोठी फूट पडली. मोरारजी देसाईंचे सरकार गेले आणि इंदिरा गांधींच्या पाठिंब्याने कुणाचे सरकार येते याची वाट चरण सिंह आणि जगजीवन राम हे दोन्हीही नेते पाहायला लागले. इंदिरा गांधींनी चरण सिंह यांना पाठिंबा देऊन बाबू जगजीवन राम यांना गंडवले. 1977 मध्ये ऐन वेळेला काँग्रेस मधून बाहेर पडून जगजीवन राम यांनी इंदिरा गांधींना धक्का दिला होता त्याचा राजकीय सुरत इंदिरा गांधींनी चरण सिंह यांना पाठिंबा देऊन उगवला. जनजीवन राम यांना पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले. हा खऱ्या अर्थाने मोठा इंदिरा पाचर प्रयोग ठरला.
मोदींचा “इंदिरा पाचर” प्रयोग
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तोच पाचर प्रयोग काँग्रेसवर करू पाहतायत. काँग्रेस मधली अस्वस्थता मोदींनी बरोबर हेरली. म्हणूनच सलग दोनदा त्यांनी काँग्रेस फुटीचे भाकीत केले. काँग्रेसमध्ये सध्या शशी थरूर, चिदंबरम पिता – पुत्र, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, राजस्थान मधले तरुण नेते सचिन पायलट हे प्रचंड अस्वस्थ आहेत. मोदींनी त्यांचीही अस्वस्थ बरोबर ओळखली आहे म्हणूनच मोदी काँग्रेसवर आणि विशेषत: गांधी परिवारावर काँग्रेस फुटीचा इंदिरा पाचर प्रयोग करत आहेत.
आज ना उद्या कुठल्यातरी राज्यात काँग्रेस फुटणार हे आता उघड सत्य आहे. कर्नाटक, केरळ, राजस्थान या राज्यांमध्ये हे घडणे अपरिहार्य आहे. कारण मोदी इंदिरा गांधींची पाचर हातात घेतली आहे.
व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App