
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी रेखा गुप्ता यांची निवड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मीडियाला “सरप्राईज” दिले तर भाजप मधल्या अनेकांना ते “धक्कातंत्र” वाटले. मीडियाने रेसमध्ये ठेवलेल्या नावांपैकी मोदींनी सगळ्यात वरचा नव्हे, तर खालचा चॉईस निवडला. पण मोदींनी हे फक्त दिल्लीच्या बाबतीत केले असे नाही, तर मोदींनी आतापर्यंत त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत जेवढे मुख्यमंत्री निवडले, ते राजकारणावर दीर्घदृष्टी ठेवून आणि सोशल इंजिनिअरिंगचे राजकीय प्रयोग करूनच निवडले. त्यामध्ये ते बहुतांश यशस्वी झाले असेच काळाच्या ओघात सिद्ध झाले.
पण पंतप्रधान मोदींनीच फक्त असे प्रयोग केले हे राजकीय वास्तव नाही. त्यांच्या आधी असेच राजकीय प्रयोग इंदिरा गांधींनी 1980 नंतर पुढच्या पाच वर्षांच्या काळात करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो प्रयोग फार काळ यशस्वी ठरू शकला नाही. त्या उलट राजकीय प्रयोगांच्या बाबतीत मोदी इंदिरा गांधींपेक्षा जास्त भारी ठरले, हे उदाहरणांसह दाखवता येऊ शकेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, जे स्वतःच मुख्यमंत्रीपदाच्या प्रयोगाचा एक महत्त्वाचा घटक होते, आतापर्यंत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, (महाराष्ट्र), योगी आदित्यनाथ, (उत्तर प्रदेश), तीरथ चरण रावत, पुष्कर सिंग धामी, (उत्तराखंड), मोहन यादव, (मध्य प्रदेश), विष्णु देव साय, (छत्तीसगड), मोहन चरण माझी, (ओडिषा), मनोहर लाल खट्टर, (हरियाणा), भजनलाल शर्मा, (राजस्थान), आनंदी बेन पटेल, विजय रूपानी, भूपेंद्र पटेल, (गुजरात), बसवराज बोम्मई (कर्नाटक) यांना वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी निवडले. यातला तीरथ चरण रावत यांचा अपवाद वगळता बाकीचे सगळे प्रयोग यशस्वी झाले. रावत यांना मध्येच बदलावे लागले. बाकी कोणाला बदलावे लागले नाही. उलट यातल्या बहुतांश मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण कारकीर्दीनंतर आपापल्या राज्यांमध्ये पुन्हा सत्ता आणण्यामध्ये ते यशस्वी झाले.
त्या उलट इंदिरा गांधींचे राजकीय प्रयोग फारसे यशस्वी झाले नाहीत. त्या पत्ते पिसल्यासारख्या मुख्यमंत्री बदलत असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी त्यावरून व्यंगचित्र देखील काढले होते. परंतु इंदिरा गांधींनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये सोशल इंजीनियरिंगचे प्रयोग करून डावललेल्या समाज घटकांमधल्या नेत्यांना मुख्यमंत्री केले होते. अब्दुल रहमान अंतुले, (महाराष्ट्र),अब्दुल गफूर, (बिहार), बरकतूल्ला खान (राजस्थान) ही त्याची उदाहरणे होती. परंतु, इंदिरा गांधींना संबंधित राज्यांमधल्या प्रस्थापित जात घटक यांच्या नेत्यांचा विरोध पूर्णपणे मोडून काढता आला नाही. त्यामुळे संबंधित मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दी दोन – अडीच वर्षांमध्ये गुंडाळल्या गेल्या होत्या. यातल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यावर त्यांच्याच पक्षातल्या म्हणजे काँग्रेस मधल्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावला होता. इंदिरा गांधींचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग काँग्रेस मधल्याच गटबाजीने आणि जात वर्चस्ववादी नेत्यांनी मोडून काढला होता.
– इंदिरा गांधींच्या अपयशाची कारणे
त्या उलट मोदींचे सोशल इंजिनिअरिंगचे सगळे प्रयोग यशस्वी झाले. मोदींनी देखील राज्यांचे मुख्यमंत्री निवडताना प्रस्थापित जात वर्चस्ववादी घटकांपेक्षा इतर समाज घटकांना महत्त्व दिले, पण ते देताना त्यांनी सामाजिक संतुलन ढासळू दिले नाही. उलट ते अधिक एकजीव कसे होईल हे पाहिले. समाजातल्या जास्तीत जास्त घटकांना सत्तेमध्ये सामावून घेतले. हा प्रयोग विशिष्ट मर्यादेपलीकडे इंदिरा गांधींना करता आला नाही. कारण त्यांना काँग्रेसमधल्या जात वर्चस्ववादी नेत्यांचा पूर्ण बीमोड करता आला नाही. या जात वर्चस्ववादी नेत्यांची इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची हिंमत नव्हती, त्यांचे तेवढे कर्तृत्वही नव्हते, पण इंदिराजींचे राजकीय प्रयोग मात्र उधळून लावण्याच्या कुरापती काढण्याची त्यांची क्षमता होती. ती क्षमता इंदिरा गांधींना काही मर्यादांमुळे मोडून काढता आली नाही. मोदींच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवला नाही. कारण निर्णय घेणारे सगळेच घटक विशिष्ट राजकीय आणि सामाजिक प्रयोगाचाच भाग राहिले त्यामुळे कुठल्या एका कारणामुळे ते प्रयोग उधळून लावण्याचा मुद्दा समोर आला नाही.
Modi more successful than Indira Gandhi in political experiments
महत्वाच्या बातम्या
- CEC नियुक्ती कायद्यावरील सुनावणी लांबली; सुप्रीम कोर्टाने दिला होळीनंतरचा वेळ
- Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा
- Hamas : गाझा युद्धबंदी कराराच्या पुढील टप्प्याची अंमलबजावणी करण्यास तयार – हमास
- Rekha Gupta भाजपने रेखा गुप्तांच्या रूपाने दिल्लीला दिला चौथ्या महिला मुख्यमंत्र्याचा लाभ!!