काँग्रेसी चष्म्यातून भाजपचे विश्लेषण; मुख्य प्रवाहातील माध्यमे पडली तोंडावर!!, असेच काय ते नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध माध्यमांनी केलेल्या माखलाशीचे वर्णन करावे लागेल. Nitin Nabin
एकतर 45 वय असलेल्या बिहार मधल्या कुठल्या प्रादेशिक नेत्याला भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि संघाचे केंद्रीय नेतृत्व एकदम राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावर नेऊन बसवेल, याची साधी भनक सुद्धा मुख्य प्रवाहातल्या कुठल्याही माध्यम प्रतिनिधींना लागली नव्हती. नितीन नवीन सिन्हा यांचे नाव जाहीर झाल्यानंतर ते नेमके कोण आहेत??, याचा “search” मारण्यात अनेक माध्यम प्रतिनिधींचा वेळ गेला. त्यातून जी काही थोडीफार माहिती हाती लागली, तीच माहिती वेगवेगळ्या शब्दांनी माध्यम प्रतिनिधींनी दिली. पण यापैकी कुणालाही नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमकी कशासाठी निवड केली??, याचे चपखल विश्लेषण करता आले नाही.
फक्त जातीचा निकष लावणे चूक
मुख्य प्रवाहातल्या सगळ्या माध्यमांनी फक्त काँग्रेसी चष्म्यातून भाजप मधल्या घडामोडींचे वर्णन आणि विश्लेषण केले. म्हणूनच त्यांनी सुरुवातीलाच नितीन नवीन सिन्हा यांची कायस्थ जात तपासली. संपूर्ण देशात कायस्थ जातीची लोकसंख्या नगण्य असताना एकदम त्यांना कसे काय राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष केले??, असे सवाल माध्यम प्रतिनिधींनी स्वतःलाच केले. जणू काही भाजप फक्त जातीय समीकरणांच्या आधारे आपल्या पक्षातल्या नियुक्त्या करतो, त्या पलीकडचा कुठलाही विचार त्या नियुक्त्यांमध्ये नसतो, असाच आव माध्यम प्रतिनिधींनी आणला, जो अर्थातच प्रत्यक्षात खरा नव्हता.
त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी भाजप मधल्या वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या वेगवेगळ्या “कुंडल्या” तपासल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यापर्यंत आणि वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे बडे नेते एकदम “ज्युनियर” नेत्याच्या हाताखाली कसे काय काम करू शकतील??, असे सवाल माध्यम प्रतिनिधींनी स्वतःलाच विचारले. पण त्यांची समाधानकारक उत्तरे मात्र त्यांना देता आली नाहीत. कारण माध्यम प्रतिनिधींनी काँग्रेसचे सगळे निकष भाजपला लावले. काँग्रेस ज्या पद्धतीने गांधी परिवाराशी एकनिष्ठ वयोवृद्ध नेत्याला अध्यक्षपदी बसविते, त्याच पद्धतीने मोदी – शाह हे आपल्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या नेत्याला अध्यक्षपदावर बसवतात. ते कुणालाच आपल्याला आव्हान ठरवू देत नाहीत, असा माध्यम प्रतिनिधींनी समज पसरवून दिला. तो देखील पूर्ण खरा नव्हता.
– काँग्रेसी निकष
काँग्रेसमध्ये कुठल्याही पदावर बसण्यासाठी गांधी परिवाराशी निष्ठा हा एकमेव निकष आहे, तसा भाजपमध्ये एकमेव निकष नाही याचे सारे भान सुद्धा माध्यम प्रतिनिधींना राहिले नाही. भाजप हा राजकीय पक्ष असला आणि त्याच्यामध्ये छोटे – मोठे गट तट असले तरी सध्याच्या सत्ताधारी आणि वर्धिष्णू भाजपमध्ये त्या गटातटांना फारसे महत्त्व उरलेले नाही, हे मध्यम प्रतिनिधींनी नीट लक्षात घेतले नाही.
– नव्या रणनीतीचा एक भाग
सध्याच्या भाजपला आणि संघाला संपूर्ण देशभर विस्तार करायचा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या समाज घटकांना जोडून घेऊन भाजपला दीर्घकाळासाठी राज्यकर्ता पक्ष म्हणून वावरायचे आहे. त्याचवेळी भाजपला नव्या पिढ्यांना आणि नव्या घटकांना आपल्याशी संलग्न करायचे आहे. ही सगळी राजकीय मसलत टप्प्याटप्प्याने पूर्ण करत न्यायची आहे. याचे भान संघ आणि भाजपच्या नेतृत्वाला आहे. त्या संदर्भातली योजना सुद्धा वेळोवेळी तयार केली जात आहे. तिची अंमलबजावणी काटेकोर करण्याचा प्रयत्न होतो आहे. नितीन नवीन सिन्हा यांची नियुक्ती हा नव्या रणनीतीचा एक भाग आहे. अजून बरेच मोठे बदल करायचे आहेत. ते राजकीय भूकंपासारखे होणार नाहीत. ते मोदींना आणि संघाला हवे तेव्हा, हवे त्यावेळी आणि हवे तसे होतील. माध्यमांना त्याची माहिती आणि मिळणार नाही. ते बदल झाल्यावरच त्यांना स्वतःच्या बुद्धीनुसार आणि वकूबानुसार फक्त विश्लेषण करत राहावे लागेल. त्या पलीकडे जाऊन मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना काहीही करता येणार नाही.
– भाजपची रचनाच वेगळी
कारण भाजपची संघटनात्मक भांडणे रचना आणि त्यासाठीची राजकीय व्यूवहरचना काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी आणि अन्य प्रादेशिक पक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. भाजप अन्य कुठल्याही राजकीय पक्षांपेक्षा नव्या घटकांशी वेगात जुळवून घेतो. त्यासाठी दीर्घकालीन योजना आखतो आणि त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करतो, हे लक्षात घेऊन भाजपच्या राजकीय हालचालींचे आणि घडामोडींचे विश्लेषण केले पाहिजे, हे माध्यम प्रतिनिधींच्या लक्षातच आले नाही. कारण भाजपच्या अंतर्गत वर्तुळापर्यंत यापैकी कुणाचीच खऱ्या अर्थाने पोहोच नाही. भाजप मधली आणि विशेषतः भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातली कुठलीच बातमी कुठेच आणि कधीच leak होत नाही, हे माध्यम प्रतिनिधींचे खरे दुखणे आहे. त्या दुखण्यावर भाजप कधीच उपायोजना करत नाही. त्यामुळे मध्यम प्रतिनिधींना काँग्रेसी चष्म्यातून पाहून भाजप मधल्या घडामोडींचे वर्णन आणि विश्लेषण करावे लागते, पण ते चुकते. आणि म्हणून मुख्य प्रवाहातली माध्यमे तोंडावर पडतात, हेच राजकीय सत्य नितीन नवीन सिन्हा यांच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदाच्या नियुक्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App