विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काेलकाता प्रकरण ममता सरकारने ज्या पध्दतीने हाताळले त्यावरून संपूर्ण देशात संताप आहे. देशभरातील डाॅक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मात्र, तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या महुआ माेइत्रा ( Mahua Moitra ) यांनी बदलापूर प्रकरणाचा संदर्भ देत नाकाने कांदे साेलायला सुरूवात केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या बलात्कार व हत्याकांड प्रकरणी कोलकाता पोलिसांनी केलेली कारवाई व महाराष्ट्रात बदलापूरमधील घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईची तुलना केली आहे. मोइत्रा म्हणाल्या, आर. जी. कर रुग्णालयातील घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलिसांनी तातडीने घटनेचा पंचनामा केला, शवविच्छेदन करून त्याचं चित्रीकरणही केलं. त्याचबरोबर काही तासांत आरोपीला अटक केली. परंतु, महाराष्ट्रात मात्र विपरीत गोष्ट पाहायला मिळाली. पोलिसांनी अनेक दिवस गुन्हा दाखल केला नव्हता. ही खऱ्या अर्थाने लोकशाहीविरोधी आघाडी आहे”.
बदलापूरची घटना घडण्याआधी कोलकात्यातही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर देशभरातील निवासी डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातील डॉक्टरांच्या संघटना आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी, डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. काही डॉक्टरांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे.
बदलापूर प्रकरणात जे घडले त्याबाबत सरकारकडून आणि पाेलीसांकडून सत्य सांगण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, मुलीच्या आईला घटना समजताच ती पहिल्यांदा पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनची प्रोसेस आहे की अशा केसेस मध्ये सगळ्यात आधी मेडीकल करावी लागते तर त्याला तीन-चार तास गेले. ही पोक्सोची केस आहे आणि या मुली लहान आहेत तर त्यांना बोलतं करणं हे पोलिसांचे केवढे मोठं स्कील आहे, त्या मुलींना बोलते करण्यासाठी पोलिसांना वेळ लागला. एफआयआर दाखल झाल्यानंतर दोन तासांच्या आत आरपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली गेली, उज्वल निकमांसारखे वकील या केसला देण्यात आले आहेत, असे सांगून चित्रा वाघ म्हणाल्या, सरकार म्हणून अशा गोष्टी टाळण्यासाठी जे जे काही करता येईल ते सरकारने केले आहे. आंदोलन करण्यासाठी मुंबईतून लोकं बदलापूरला गेले. बदलापूरमधील घटना राजकीय विषय नाही. बदलापूरच्या घटनेत जे करता येईल ते सरकारने केले. आंदोलनात लाडकी बहीण योजनेचे बॅनर कसे आले ? बदलापूरच्या घटनेवर विरोधकांनी राजकीय पोळी भाजली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more