विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई, मराठवाड्यासह थेट विदर्भापर्यंत रविवारी रात्रीपासून पावसाने धूमशान घातले. आता आज मंगळवार, 19 ऑगस्ट रोजीही मुंबई पुण्यासह एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केलाय. तर विदर्भातल्या गडचिरोलीसह चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. तूर्तास तरी पूरस्थिती आटोक्यात असून, जवळपास एक हजार हेक्टरवरील शेतपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला.
पुढील 3-4 तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली असून, राज्यात उद्याही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
7 जिल्ह्यांना रेड, 4 ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने सात जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. त्यात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट माथ्याचा समावेश आहे. येथे उद्या काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, दुर्गम ठिकाणी अति मुसळधार पावसाची भीती व्यक्त करण्यात आलीय. हवामान विभागाने चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोलीचा समावेश आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने जवळपास 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलाय. त्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळचा समावेश आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. या काळात वाऱ्याचा वेग साधारणतः 30-40 किमी प्रतितास राहील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App