विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत जरी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अवामानकारक उद्गार काढले असले, तरी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांविषयी लिहिलेले पत्र त्यांना वाहिलेली श्रद्धांजली त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काढलेला पोस्टल स्टॅम्प या बाबी त्यापेक्षाही ठळक आहेत. Maharashtra assembly 50 th anniversary : lata mangeshkar sang a poem “Jayostute sri mahanmangale
पण त्या पलिकडे जाऊन एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे, ती म्हणजे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासमोर एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले महान्मंगल स्तोत्र जयोस्तुते हे भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांनी गायले होते. निमित्त होते, महाराष्ट्र विधानसभेच्या सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे.
त्याची कहाणी अशी :
महाराष्ट्र विधानमंडळाला 1987 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्र विधीमंडळाच्या संसदीय इतिहासातील या अतिशय महत्त्वपूर्ण घटनेचे औचित्य साधून विधान परिषदेच्या सुवर्णमहोत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन तत्कालीन उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते 18 जानेवारी 1988 रोजी झाले. या समारंभास लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष बलराम जाखड तसेच सलग 18 वर्षे विधान परिषदेच्या सभापतीपदी राहिलेले वि. स. पागे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेच्या सुवर्णमहोत्सवाचे उद्घाटन 3 सप्टेंबर 1988 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते मुंबईत झाले. लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष बलराम जाखड हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून शंकरराव जगताप हे उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्यपाल कासू ब्रह्मानंद रेड्डी, विधान परिषदेचे सभापती जयंतराव टिळक, मुख्यमंत्री शरद पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष बबनराव ढाकणे, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई आणि राज्यपालांच्या पत्नी व्यासपीठावर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला भारताच्या सर्व राज्यांतील सर्व विधानसभांचे अध्यक्ष, प्रतिनिधी, केंद्रीय मंत्री, नामवंत संसदपटू अगत्याने उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या दृष्टीने या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासमोरच भारतरत्न श्रीपती लता मंगेशकर आणि त्यांच्या चमूने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले महन्मंगल स्तोत्र, “जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे” याचे गायन केले होते. या गीताचा अर्थ त्यावेळी राजीव गांधी यांनी शंकरराव जगताप यांच्याकडून समजून घेतला होता. या संदर्भातला महत्त्वाचा पुरावा म्हणून त्याचा व्हिडिओ चंद्रशेखर साने यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर शेअर केला आहे.
पंतप्रधान पंडित नेहरूंच्या कारकिर्दीत सावरकरांच्या गीतांवर सरकारी कार्यक्रमांमध्ये आणि आकाशवाणीवर अघोषित बंदी होती. लालबहादूर शास्त्रींच्या काळात ती काही शिथिल झाल्याचा निर्वाळा सावरकरांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी दिला आहे. त्यानंतर सावरकरांची दोन गीत जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला ही आकाशवाणीवर गायली जाऊ लागली होती. दूरदर्शनने देखील सावरकरांच्या जन्मशताब्दी वर्षात 1983 मध्ये काही कार्यक्रम सादर केले होते.
परंतु महाराष्ट्र विधानसभेच्या सुवर्ण महोत्सवी उद्घाटन कार्यक्रमात म्हणजे अधिकृत सरकारी कार्यक्रमात पंतप्रधानांसह सर्व वरिष्ठ पदस्थ उपस्थित असताना त्यांच्यासमोर सावरकर लिखित जयोस्तुते गीताचे गायन होणे याला अत्यंत विशेष महत्त्व आहे. मग राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक काहीही म्हणोत. सावरकरांच्या महत्त्वावर त्याचा काहीही परिणाम होत नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App