विशेष प्रतिनिधी
स्वतंत्र भारतातले पहिले मतदार श्याम सरण नेगी आज 5 नोव्हेंबर 2022 रोजी गेले. 106 व्या वर्षी त्यांनी आपल्या जीवनातला अखेरचा श्वास घेतला. पण अखेरचा श्वास घेण्यापूर्वी तीनच दिवस आधी म्हणजे 2 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी आपल्या आयुष्यातले अखेरचे मतदान केले. वास्तविक त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचे होते. पण प्रकृती बिघडल्याने त्यांना ते शक्य होत नव्हते म्हणून हिमाचल प्रदेशातील मतदान अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पोस्टल बॅलेट द्वारे मतदान घेतले. Laxman’s Common Man and True Common Man of India
श्याम सरण नेगी यांच्या निधनाची बातमी वाचल्यावर सहज प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनची आठवण झाली. लक्ष्मण यांच्या संकल्पनेतील कॉमन मॅन आणि श्याम सरण नेगी या दोघांच्याही जीवनात विलक्षण साम्य होते. श्याम सरण नेगी हे देखील लक्ष्मण यांच्या संकल्पनेतल्या कॉमन मॅन सारखे सर्वसामान्य जीवन जगले. किंबहुना भारतीय जीवनात अविभाज्य असलेले कॉमन मॅनच्या जीवनात लक्ष्मण यांनी चितारलेले सर्व खाचखळगे श्याम सरण नेगी यांच्या जीवनात प्रत्यक्षात आले. ते काल्पा मधील शाळेत शिक्षक होते. परंतु गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना आपले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षणही पूर्ण करता आले नव्हते. ते महागाईने होरपळले. टंचाईने ग्रस्त झाले. परिस्थितीने नाडले. जे – जे त्रास लक्ष्मणच्या कॉमन मॅनच्या चित्रातून सर्वसामान्य भारतीयांना दिसले, ते सर्व त्रास श्याम सरण नेगी यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष भोगले.
पण लक्ष्मण यांच्या संकल्पनेतील कॉमन मॅन हा देखील कन्व्हीक्शन असलेला भारतीय आहे. तो देशप्रेमी आहे. समस्या अफाट असल्या तरी त्याची जीवनेच्छा अतूट आहे. तो कोणत्याही परिस्थितीला सहज शरण जात नाही अथवा तो मनातून तुटतही नाही. तो परिस्थितीशी झगडतो. संघर्ष करतो. वैतागून पडतो… पण पुन्हा उठतो. तो दुःखी होतो. मनातून खट्टू होतो. पण आनंदीही दिसतो. आपल्या मौनातून राजकीय नेत्यांवर शरसंधान साधतो. सामाजिक त्रुटींवर बोट ठेवतो. पण तो प्रत्येक निवडणुकीत मतदान करतो. मतदान करताना तो कन्फ्युज्ड असतो, पण मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर मात्र आपण भारताचे भविष्य सुरक्षित केल्याचे त्याच्या चेहऱ्यावर समाधान असते किंबहुना आपण मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडल्याचा त्याला आनंद होतो.
श्याम सरण नेगी यांचे जीवन देखील कॉमन मॅन सारखेच होते. ते देखील महागाईने होरपळले. टंचाईने ग्रस्त झाले. सामाजिक समस्यांनी कातवले. पण त्यांच्या जीवनात असलेल्या सर्व अडथळ्यांवर – समस्यांवर त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तरे शोधून आपले जीवन ज्ञापन सुरू ठेवले होते. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी आपल्या मतदानाचे कर्तव्य निष्ठेने बजावले होते. 1951 सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून हिमाचल प्रदेश विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या त्यांच्या अखेरच्या निवडणुकीपर्यंत एकूण 33 निवडणुकांमध्ये त्यांनी मतदान केले. मतदानाचे पावित्र्य आणि निष्ठा जपल्या. जीवनाची अखेरही पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करून केली. लक्ष्मण यांनी चितारलेले कॉमन मॅन हा त्यांच्या संकल्पनेतला होता, पण श्याम सरण नेगी हे ट्रू कॉमन मॅन ऑफ इंडिया होते.
एरवी देशातले बडे बडे नेते स्वतःला लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून घेतात. त्याच्या मोठमोठ्या जाहिरातींचे फ्लेक्स शहराशहरांमध्ये आणि गावागावांमध्ये लावतात. पण श्याम सरण नेगी हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचे आधारस्तंभ होते. कारण त्यांनी लोकशाहीतले सर्वात पवित्र कर्तव्य, जे मतदान ते त्यांनी अव्यभिचारी निष्ठेने पार पाडले होते!!… त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App