विशेष प्रतिनिधी
कोलकाता : Kolkata Law College कोलकात्यातील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या २४ वर्षीय विधी विद्यार्थिनीवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात गंभीर खुलासे समोर येत आहेत. या गुन्ह्याचा कट आरोपींनी दोन दिवस आधीपासूनच रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा (३१), जो कॉलेजचा माजी विद्यार्थी असून सध्या कर्मचारी आणि तृणमूल काँग्रेसचा विद्यार्थी शाखेचा सक्रिय नेता आहे, त्याच्यासोबत झैब अहमद आणि प्रमीत मुखर्जी या दोन सध्याच्या विद्यार्थ्यांनी हा घृणास्पद गुन्हा केला, असा आरोप आहे.Kolkata Law College
पीडितेच्या वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडिओ क्लिप्स आणि इतर परिस्थितीजन्य पुरावे या सर्वांचा आढावा घेतल्यावर तिचे वक्तव्य विश्वासार्ह आणि सत्य असल्याचे स्पष्ट होत आहे. पीडितेच्या गळ्यावर आणि छातीवर जखमांचे स्पष्ट निशाण आहेत. २८ जून रोजी तिची मेडिको-लीगल तपासणी झाली आहे.
पीडितेच्या मते, २५ जून रोजी संध्याकाळी ७:३० ते १०:५० दरम्यान कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाच्या खोलीत तिच्यावर हा सामूहिक अत्याचार झाला. ती पॅनिक अटॅकमुळे रडत होती, परंतु आरोपींनी मदत करण्याऐवजी आणखी शारीरिक अत्याचार केला. आरोपी मिश्राने मित्रांना इनहेलर आणायला पाठवले. सीसीटीव्ही फुटेजनुसार, अहमदने ८:२९ वाजता इथन फार्मा मेडिकल स्टोअरमधून इनहेलर खरेदी केला. रोख रक्कम नसल्यामुळे त्याने ३५० रुपये UPI द्वारे दिले आणि ही पावती पोलिसांनी जप्त केली आहे.
अहमद आणि मुखर्जी यांनी चौकशीदरम्यान कबुली दिली की, त्यांनी मिश्राला मदत केली कारण कॉलेजमधील तृणमूल काँग्रेसच्या युथ विंगमध्ये पद देण्याचे आश्वासन त्याला दिले गेले होते. याच तृणमूलच्या संघटनेत पीडितेला मुलींच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
पीडितेने सांगितले की, चर्चेसाठी थांबवले गेले असताना युनियन रूममध्ये किमान सात जण उपस्थित होते. सीसीटीव्ही फुटेजमधून अजून काही चेहऱ्यांची ओळख पटली असून त्यांची चौकशी होणार आहे. पोलिसांनी ४ वाजल्यानंतर उपस्थित १७ जणांची यादी केली आहे. सुरक्षा रक्षक पिनाकी बॅनर्जीने आरोपींनी आपला फोन हिसकावल्याचे सांगितले असून, फुटेजमध्ये तो परिसरात फिरताना दिसतो.
या घटनेवरून कलकत्ता उच्च न्यायालयात तीन याचिका आणि सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. एका याचिकेत निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास करावा अशी मागणी आहे. या याचिकांवर येत्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नेमलेले चौघांचे पथक कोलकात्यात दाखल झाले असून त्यांनी पोलिस मुख्यालय आणि कॉलेजला भेट दिली आहे. त्यानंतर भाजप आणि माकपच्या विद्यार्थी संघटनांमध्ये कॉलेजबाहेर झटापट झाली.
संकट टाळण्यासाठी कॉलेज प्रशासनाने सोमवारी अधिसूचना काढून वर्ग अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहेत. शिक्षण विभागाच्या सूचनेवरून मोनोजित मिश्राला नोकरीवरून काढून टाकण्यात आले असून प्रमीत मुखर्जी व झैब अहमद या दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App