उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनामाच्या नंतर अनेकांना जम्मू काश्मीर आणि मणिपूरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची आठवण झाली. राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड हे आता सत्यपाल मलिक यांच्यासारखेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आग ओकू लागतील, असे भाकीत अनेकांनी केले, पण यापैकी कुणालाही जगदीप धनखड हे मधू लिमये यांच्यासारखे वागले, असे सुचले नाही. याचे कारण जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या भोवतीची फक्त नजीकचीच परिस्थितीच अनेकांनी तपासली. जगदीप धनखड यांच्या मूळच्या राजकीय स्वभावाकडे कुणाचे लक्षच गेले नाही. त्यामुळे जगदीप धनखड हे फक्त सत्यपाल मलिक होतील, एवढेच भाकित काही विशिष्ट बुद्धीच्या माध्यमांनी वर्तविले.
वास्तविक जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याची अनेक कारणे असली आणि ती आता जाहीरही झाली असली, तरी मूळात त्यांची केंद्र सरकारशी थेट पंगा घेण्याची राजकीय वृत्ती ही समाजवादी प्रवृत्तीमधून आली, हे फारसे कुणाच्या लक्षात आले नाही. जगदीप धनखड हे काही मूळचे संघ प्रवृत्तीचे किंवा भाजप प्रकृत्तीचे नेते नाहीत. ते मूळात समाजवादी प्रवृत्तीचे जनता दलाचे नेते आहेत. त्यांनी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केले होते. 1990 च्या दशकात ते जनता दलाचे खासदार आणि आमदार राहिले होते. अर्थातच त्यांची मूलभूत राजकीय प्रवृत्ती मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाची जुळलेली नव्हे, तर जिथे जाऊ तिथे भांडण लावू, जिथे जाऊ तिथे मतभेद व्यक्त करू, या जुन्या समाजवादी प्रवृत्तीशी जुळणारी राहिली. त्यामुळेच त्यांना मोदी सरकारने उपराष्ट्रपती पदासारख्या उच्चतम पदावर बसवून देखील जगदीप धनखड यांची मूलभूत प्रवृत्ती बदलली नाही.
– प्रोटोकॉलचा घोळ
राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती ही पदे प्रोटोकॉल नुसार पंतप्रधान पदाच्या वरची असली तरी संविधानिक पातळीवर कार्यकारी प्रमुख म्हणून पंतप्रधानांना जे अधिकार आहेत किंवा मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत, ते राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींना नाहीत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याच्या आधारे राष्ट्रपतींनी कारभार करायचा आणि उपराष्ट्रपतींनी राज्यसभेचे सभागृह निस्पृह पणे चालवायचे ही त्यांची खरी कामे आहेत. ती राज्यघटनेने नेमून दिलेली कामे आहेत. जगदीप धनखड उपराष्ट्रपती पदावर असताना अनेकदा न्यायव्यवस्थेविरोधात बोलले. राजकीय मते व्यक्त करताना मोदी सरकार अस्वस्थ होईल, अशा स्वरूपाने त्यांनी भाष्य केले. त्यांनी स्वतःच्या पद्धतीने प्रोटोकॉलचे अर्थ लावले. “प्रोटोकॉल मधला सन्मान” आणि “प्रोटोकॉल मधले अधिकार” या दोन भिन्न गोष्टी असतात, धनखड यांनी त्यांची सरमिसळ केल्याचे बोलले गेले म्हणूनच आपण पंतप्रधानांपेक्षा कार्यकारी पातळीवर देखील वरच्या दर्जाचे आहोत, असा भ्रम त्यांनी स्वतःमध्ये पैदा केल्याचे बोलले गेले. त्यामुळे केंद्र सरकार आणि उपराष्ट्रपती यांच्यातले संबंध सहज सुरळीत न राहता ते टप्प्याटप्प्याने “असहज” होत गेले थोडक्यात अस्वस्थ होत गेले. म्हणून उपराष्ट्रपतींची “राजकीय तब्येत” बिघडल्याचे बोलले गेले.
– प्रणव मुखर्जींसारखे वागले नाहीत
पण हे सगळे संघ प्रवृत्तीच्या सरकारच्या धोरणांपेक्षा समाजवादी प्रवृत्तीच्या उपराष्ट्रपतींच्या स्वभावामुळे घडले. वास्तविक जगदीप धनखड यांच्यासमोर प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या राष्ट्रपतींचा आदर्श होता. स्वतः प्रणव मुखर्जी काँग्रेसी प्रवृत्तीचे नेते होते. त्यांची सगळी राजकीय जडणघडण इंदिरा गांधींच्या काँग्रेसमध्ये झाली होती, तरी देखील त्यांनी राजकीय दृष्ट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अत्यंत उत्तम जुळवून घेतले होते. त्यात त्यांनी स्वतःच्या तत्त्वांशी कुठेही तडजोड केली नव्हती किंवा मोदींना देखील त्यांनी त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करायला लावली नव्हती, तरी देखील दोघांचे वैयक्तिक पातळीवरचे संबंध अतिशय मधुर आणि राजकीय पातळीवरचे संबंध एकमेकांशी जुळवून घेऊन काम करण्यासाठी टिकून राहिले होते किंबहुना वृद्धिंगत झाले होते. मात्र प्रणव मुखर्जी यांचे हे राजकीय कौशल्य जगदीप धनखड यांना आत्मसात करता आले नाही.
– मधू लिमये यांच्यासारखे वागले
त्या उलट त्यांनी मधू लिमये यांच्यासारख्या समाजवादी प्रवृत्तीच्या नेत्यासारखे वागणे पसंत केले. जनता पक्षाच्या राजवटीच्या काळात समाजवाद्यांनी कारभार सुरळीत करण्याकडे लक्ष दिले नाही. कारभार सुरळीत कसा होईल, अनेक भिन्न राजकीय प्रवृत्तींच्या व्यक्ती सरकारमध्ये एकत्र आल्यात तर त्यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे याकडे लक्ष पुरविले नाही. चांगला कारभार आणि सुसंवाद यावर भर देण्यापेक्षा मधू लिमये यांनी संघ आणि जनता पक्ष यांच्यातले द्वैत जास्त पोसले होते. कुठलीही सबळ कारण नसताना दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उकरून काढला होता. त्यामुळे जनता पक्ष फुटला. जनता पक्षाचे सरकार गेले. समाजवाद्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. जगदीप धनखड हे मधू लिमये यांच्यासारखेच समाजवादी प्रवृत्तीनुसार वागले. त्यांनी सरकारी धोरणांशी सुसंगत वागण्यापेक्षा सरकार विरोधी वागण्यावर भर दिला, पण इथे त्यांच्यामुळे मोदी सरकारचे नुकसान झाले नाही, तर त्यांचे वैयक्तिक नुकसान झाले. जगदीप धनखड यांना राजीनामा देणे भाग पडले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App