शोध मोहीम सुरू; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात पोहोचून शोध मोहीम राबवली
विशेष प्रतिनिधी
जम्मू -काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडला. यादरम्यान जवानांच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात पोहोचून शोध मोहीम राबवली. हे दहशतवादी खारी करमारा भागातून सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराने ३ दहशतवाद्यांना ठार मारले आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी उधळून लावला.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सतर्क सैन्य दलांनी खारी करमारा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दोन्हीबाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यादरम्यान, तीन दहशतवादी गोळ्या घालून ठार झाले.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. मेंढर तहसीलमधील पठाण तीर भागातील जंगलात दहशतवाद्यांनी सैन्यावर हल्ला केला. या प्रत्युत्तराच्या कारवाईत सैन्याने दहशतवाद्यांचा टॉप कमांडर मारला होता. सीआरपीएफ आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App