विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती ( Mehbooba Mufti )यांची कन्या इल्तिजा मुफ्ती ( Iltija Iqbal ) जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत पदार्पण करणार आहे. इल्तिजा दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कौटुंबिक बालेकिल्ला असलेल्या बिजबेहारा येथून निवडणूक लढवणार आहेत. पीडीपीच्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावणाऱ्या इल्तिजा या पक्षप्रमुखांच्या मीडिया सल्लागार म्हणून काम करत आहेत.
मेहबुबा मुफ्ती निवडणूक लढवणार नाहीत?
पीडीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूबा मुफ्ती आता आपला राजकीय वारसा आपल्या मुलीकडे सोपवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. असे बोलले जात आहे की मेहबुबा आता मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार असून यावेळी त्या विधानसभा निवडणूक लढवण्यापासून दूर राहतील. अशा परिस्थितीत जेव्हा भविष्यात पीडीपीच्या नेत्या बनू शकतील इल्तिजा मुफ्ती, जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित खास गोष्टी.
इल्तिजा बिजबेहारा येथून उमेदवार
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती (३७) या दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारा येथून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. सोमवारी ही घोषणा करण्यात आली. आगामी निवडणुकीसाठी पक्षाने जाहीर केलेल्या 8 उमेदवारांच्या यादीत इल्तिजा मुफ्ती यांच्या नावाचाही समावेश आहे. बिजबेहरा हा मुफ्ती कुटुंबाचा पारंपरिक गड मानला जातो.
DU मधून राज्यशास्त्रात पदवीधर
इल्तिजा मुफ्तींबद्दल सांगायचे तर, त्यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात बॅचलर डिग्री आणि युनायटेड किंगडमच्या वॉर्विक विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत असताना त्यांना मीडिया सल्लागार म्हणून नेमण्यात आले. तेव्हा इल्तिजा पहिल्यांदा प्रकाशझोतात आल्या. ऑगस्ट 2019 मध्ये, जेव्हा संपूर्ण काश्मीरमध्ये संचारबंदी होती, तेव्हा इल्तिजा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक धाडसी पत्र लिहून विचारले होते की त्यांना त्यांच्या श्रीनगरच्या निवासस्थानी नजरकैदेत का ठेवण्यात आले आहे?
इल्तिजा यांना खोऱ्यातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली, जिथे त्यांनी त्यांच्या आईला भेटण्याची परवानगी मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, जी त्यांना अखेरीस मिळाली. मेहबूबा मुफ्ती यांच्या सुटकेनंतर इल्तिजा त्यांच्या मीडिया संवाद आणि मीटिंगमध्ये सोबत दिसल्या. जून 2022 मध्ये इल्तिजा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर “आपकी बात विथ इल्तिजा” नावाची पाक्षिक व्हिडिओ संवाद मालिका सुरू केली, ज्यामध्ये त्या जम्मू आणि काश्मीरच्या लोकांवर परिणाम करणाऱ्या समस्या आणि निर्णयांबद्दल बोलतात.
पासपोर्ट प्रकरणातही प्रसिद्धीच्या झोतात
इल्तिजा या दोन बहिणींमध्ये मोठ्या आहेत. त्यांचे वडील जावेद इक्बाल शाह, एक व्यापारी आणि कधीकाळी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते होते. त्यांच्या आई मुफ्ती यांनी त्यांना एकटेच वाढवले होते. इल्तिजा यांची धाकटी बहीण श्रीनगरमध्ये जनसंपर्क व्यावसायिक आहे. 2023 मध्ये, इल्तिजा यांनी त्यांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणावरून अधिकाऱ्यांशी संघर्ष केला. त्यांच्या पासपोर्टची मुदत 2 जानेवारी रोजी संपली होती आणि त्यांनी 8 जून 2022 रोजी नवीन पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज केला होता.
निवडणुकीच्या मैदानावर सर्वांचे लक्ष
मात्र, श्रीनगरच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (आरपीओ) त्यांना नवीन पासपोर्ट जारी केला नाही. यानंतर इल्तिजा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात धाव घेतली आणि पासपोर्ट नूतनीकरणासाठी आरपीओकडे निर्देशांची मागणी केली. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी पोलिस प्रशासनाला पत्रही दिले. शेवटी, CID द्वारे “टॉप सीक्रेट” म्हणून वर्गीकृत केलेल्या प्रतिकूल पडताळणी अहवालानंतरही, RPO ने एप्रिल 2023 मध्ये त्यांना पासपोर्ट जारी केला. इल्तिजा मुफ्ती यांचा राजकीय प्रवास आता एका नव्या वळणावर आला असून सर्वांच्या नजरा त्यांच्या आगामी निवडणूक पदार्पणाकडे लागल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App