Modi 3.0 : मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्यापेक्षा खातेवाटपात मोठी जबाबदारी आणि शिकण्याची संधी!!


नाशिक : पुण्याचे प्रथमच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्या झटक्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाल्याने अनेक राजकीय नेत्यांनी आणि मराठी प्रसार माध्यमांनी त्याचे वर्णन मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची “लॉटरी” लागल्याचे केले. ते अर्धसत्य आहे. Great opportunity and responsibility of cooperative ministership for murlidhar mohol

वास्तविक मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या लॉटरीपेक्षा मिळालेली खाती पाहिली, तर ती जबाबदारी आणि शिकण्याची संधी अधिक आहे असे म्हणावे लागेल. हे लिहायची कारणे अनेक आहेत. त्या कारणांचा थोडा धांडोळा घेतला, तर शीर्षकातली बाब समजणे सोपे जाईल. एकतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची लॉटरी लागणे यापेक्षा ती जबाबदारी आणि उत्तरदायित्व अधिक असते, हा आतापर्यंत त्यांच्याबरोबर काम केलेल्या मंत्र्यांचा अनुभव आहे रविशंकर प्रसाद, राजीव प्रताप रूडी, डॉ. हर्षवर्धन, इतकेच काय पण अनेक विद्यमान मंत्र्यांनी देखील तो अनुभव घेऊन झाला आहे. मोदींबरोबर काम करताना मंत्र्यांना किती ॲलर्ट राहावे लागते आणि माहितीची किती अचूकता लागते, याचे वर्णन रविशंकर प्रसाद, राजनाथ सिंह, अमित शाह यांनी काही ठिकाणी केले होते. कारण स्वतः पंतप्रधान मोदी 24/7 काम करणारे पंतप्रधान आहेत. त्यामुळे मंत्र्यांना त्यांच्याबरोबर कामाच्या दृष्टीने फारच अलर्ट आणि अपडेट राहावे लागते. ही कसरत अनेकांना अवघड गेल्याची उदाहरणे आहेत. त्यासाठी नावे घेण्याची गरज नाही.

पण मुरलीधर मोहोळ यांच्याबाबतीत त्यापेक्षा थोडी वेगळी देखील केस आहे, ती म्हणजे मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्री या नात्याने जी खाती वाटायला आली आहेत, ती विशेष महत्त्वाची आहे आणि त्याचे कॅबिनेट मंत्री देखील विशेष महत्त्वाचे आहेत. मुरलीधर मोहोळ यांना सहकार राज्यमंत्री म्हणून अमित शाह यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे, तर नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री म्हणून तेलगू देशम पार्टीचे वरिष्ठ नेते राम मोहन नायडू यांच्याबरोबर काम करावे लागणार आहे.



सहकार आणि नागरी हवाई वाहतूक ही दोन्ही खाती देशाच्या व्यापकतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेतच, पण त्याहीपेक्षा त्यांचे कॅबिनेट मंत्री त्यांचा विशिष्ट अनुभव आणि दर्जा याला विशेष महत्त्व आहे. इथे मुरलीधर मोहोळ यांना जबाबदारी आणि शिकण्याची संधी मिळणार आहे, या वाक्याचा अर्थ समजतो. मूळात केंद्रीय सहकार मंत्रालय सुरू करणे आणि ते खाते अमित शाह यांच्याकडे सोपविणे ही स्वतः मोदींची विशिष्ट आयडिया आहे. अमित शाह यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये त्या खात्याला विशिष्ट शिस्त लावून विशिष्ट कामे करून घेऊन देशातल्या सहकारी संस्थांची एक सुसंगत मोट बांधली आहे, जिचा देशातल्या सहकारावर आणि अनुषंगाने राजकारणावर परिणाम होतो. महाराष्ट्रातील सहकार चळवळ नीट लक्षात घेता मुरलीधर मोहोळ सहकार राज्यमंत्री असणे याला वेगळे महत्त्व आहे.

मुरलीधर मोहोळ हे ग्रामीण पार्श्वभूमी असणारे पुण्यासारख्या शहरातले राजकारणी आहेत. त्यांना सहकाराचे ताणेबाणे केंद्रीय पातळीवरून समजून घेणे, प्रत्यक्ष सहकार मंत्रालयाची विशिष्ट धोरणे राज्यांमध्ये राबविणे हे अमित शाह यांच्याकडून शिकून घेण्याची संधी आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर भाजपने पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली आहे. भाजपच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच अवघड बालेकिल्ला राहिला आहे. त्या बालेकिल्ल्यामध्ये समन्वय राखणे हे मुरलीधर मोहोळ यांना काम करावे लागले होते. या कामाचा त्यांच्या विशिष्ट अनुभव लक्षात घेऊनच त्यांना सहकारासारख्या महत्त्वाच्या खात्यात अमित शाहांच्या हाताखाली काम करण्याची मोदींनी संधी दिली आहे.

मोहोळ यांचे मराठा नेतृत्व आणि वय या बाबी त्यांना अनुकूल आहेत. मंत्रिपदाची संधी आणि मिळालेल्या खात्यांचे महत्त्व अधिक आहे. मोहोळ या संधीचा कसा फायदा घेतात??, ते किती लवकरात लवकर खात्यांमधले ताणेबाणे समजून घेऊन काम करतात??, मिळालेल्या संधीचे किंबहुना लागलेला लॉटरीचे ते कितपत सोने करतात??, याला मोदींनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या दृष्टीने आणि स्वतः मोहोळ यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे

Great opportunity and responsibility of cooperative ministership for murlidhar mohol

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात