प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नावाच्या दोन पक्षांनी केंद्रातल्या भाजप सरकार विरुद्ध दक्षिणोत्तर रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूतून सुरू झाली आहे, तर नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. Great Bajirao Peshwa was honored by Pawar in Talkatora Stadium at National Convention of NCP
या तालकटोरा स्टेडियम मध्येच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडून थोरल्या बाजीराव पेशव्यांचा गौरव पूर्ण उल्लेख झाला आहे. राष्ट्रीय अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात शरद पवारांनी देशासमोर असलेल्या विविध प्रश्नांचा उहापोह तर केला आहेच, पण त्याचबरोबर तालकटोरा स्टेडियमचा इतिहास सांगताना त्यांनी थोरले बाजीराव पेशवे आणि सदाशिवराव भाऊ पेशवे यांचा उल्लेख केला आहे. हेच ते तालकटोरा स्टेडियम आहे, की ज्या भूमीवरून सन 1737 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी दिल्लीतल्या मुघल सल्तनतीला आव्हान दिले होते, त्या भूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन होत आहे ही अभिमानाची बाब आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.
त्याचवेळी त्यांनी सदाशिवराव भाऊ पेशव्यांचा देखील उल्लेख केला आहे. सदाशिवराव भाऊ पेशव्यांना दिल्ली जिंकण्याची संधी आली होती. ते देखील आज ताल कटोरा स्टेडियम जेथे उभे आहे त्याच भूमीवर डेरा टाकून उभे होते. परंतु, त्यांना कोणीतरी प्रथम गंगास्नान करण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी त्यांनी दिल्ली जिंकण्याची संधी घेतली असती. परंतु ती सोडून ते प्रथम गंगास्नानाला गेले आणि तिथून पानिपतावर गेले. तेथे मराठ्यांचा पराभव झाला, असा उल्लेख शरद पवारांनी आपल्या भाषणात केला आहे.
मूळात शरद पवार यांच्या मुखातून पेशव्यांचा उल्लेख येणे आणि तोही गौरवपूर्ण, ही बाबच दिल्ली अधिवेशनाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे!! एरवी शरद पवारांनी नेहमीच महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आहे असे सांगताना ठरवून टिळक आगरकर यांना वगळले आहे. इतकेच काय पण पुण्याच्या एका कार्यक्रमात त्यांनी टिळक पगडी घालायचे नाकारून महात्मा फुले यांची पगडी इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात घातली गेली पाहिजे, असे आदेश दिले होते. पवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी बाबासाहेब पुरंदरे यांना देखील दोषी धरले आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करणे आणि तो देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात करणे याला वेगळे संदर्भ जोडले जाणार आहेत.
पवारांच्या या भाषणाचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि त्यातही खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसे पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App