विशेष प्रतिनिधी
पणजी : Pramod Sawant गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात जबरदस्तीने आणि फसवणुकीच्या आधारे होणाऱ्या धर्मांतरांना अटकाव घालण्यासाठी लवकरच धर्मांतर प्रतिबंधक कायदा (Anti-Conversion Law) आणण्याचा निर्धार विधानसभेत व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रमेन्द्र शेट आणि आम आदमी पक्षाचे क्रूझ सिल्वा यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.Pramod Sawant
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, “उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड यांसारख्या अनेक राज्यांनी सक्तीच्या धर्मांतरांना थांबवण्यासाठी कठोर कायदे लागू केले आहेत. आता गोव्यातही अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. म्हणूनच राज्यात असा कायदा करणे अत्यावश्यक झाले आहे.” त्यांनी विरोधी काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडे वळून, “या विधेयकाला आपल्याला सर्वपक्षीय पाठिंबा हवा आहे,” असेही ठासून सांगितले.Pramod Sawant
या चर्चेच्या दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी गोव्यातून अटक केलेल्या एस. बी. कृष्णा ऊर्फ आयेशा ऊर्फ निक्की या महिलेच्या प्रकरणाने वातावरण तापले. या महिलेवर दोन तरुणींना लग्नाच्या आमिषाने फसवून पळवून नेल्याचा आरोप आहे. तपासात ती ISIS प्रेरित इंटरस्टेट धर्मांतर रॅकेट, तसेच पीएफआय आणि एसडीपीआय या वादग्रस्त संघटनांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीला भारतात “लव्ह जिहाद”द्वारे महिलांना लक्ष्य करून धर्मांतर घडवून आणण्याचे काम दिले जात असल्याचेही पोलीस तपासातून समोर आले आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी यावर भाष्य करताना स्पष्ट केले की, “इंटर-रिलीजन विवाह ही लोकांची वैयक्तिक पसंती आहे, त्यावर सरकारचा आक्षेप नाही. पण जर कोणावर दबाव टाकून, आर्थिक लालच देऊन किंवा फसवणूक करून धर्मांतर घडवून आणले जात असेल, तर अशा घटनांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
गोवा हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे आणि येथील धार्मिक सलोखा अबाधित ठेवणे आवश्यक आहे, असे सांगून सावंत म्हणाले की, “लव्ह जिहाद”च्या नावाखाली जी फसवणूक चालते आहे, तिचे प्रकार गोव्यातही घडत आहेत, आणि याकडे आता डोळसपणे पाहण्याची वेळ आली आहे.
आमदार क्रूझ सिल्वा यांनी या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी विचारले, “एस. बी. कृष्णा सारखी व्यक्ती जुना गोवा येथे अनेक दिवस राहत होती आणि तिचे ISIS शी कनेक्शन होते, पण गोवा पोलीस, क्राईम ब्रँच वा अन्य यंत्रणांना याची माहितीच नव्हती, हे अत्यंत गंभीर अपयश नाही का?” त्यांनी राज्यातील तपास यंत्रणांनी अशा घटनांची व्यापक चौकशी करून *‘आंतरराष्ट्रीय धर्मांतर रॅकेट’*चे पूर्ण नेटवर्क शोधून काढावे, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेल्या संकेतांनुसार, गोवा सरकार लवकरच एक मसुदा तयार करून विधानसभा पटलावर मांडणार असून त्याद्वारे धर्मांतराच्या नावावर चालणाऱ्या जबरदस्ती, फसवणूक, आणि धार्मिक कट्टरतेच्या कारवाया रोखण्याचे ठोस पाऊल उचलणार आहे.
“धर्म ही श्रद्धेचा विषय आहे, व्यवसाय किंवा राजकीय साधन नाही. त्याचे शस्त्र बनू देणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत सावंत यांनी गोव्यातील जनतेला विश्वास दिला की धार्मिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App