
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यांची वर्णने बालेकिल्ला की उद्ध्वस्त किल्ला??, अशा शब्दांमध्ये करायची वेळ आली. कारण या बड्या नेत्यांना आत्तापर्यंत आपल्या मानल्या गेलेल्या बालेकिल्ल्यातच पायाला भिंगरी लावून प्रचार करण्याची वेळ आली. बारामती अमेठी आणि रायबरेली हे लोकसभेचे मतदार संघ वर वर्णन केलेल्या बालेकिल्ल्यांची उद्ध्वस्त उदाहरणे आहेत.Gandhi family put on rigorous test in amethi and raibareli constituencies
यापैकी बारामतीतले मतदान होऊन गेले आणि आज अमेठी + रायबरेलीतले मतदान होते आहे. यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या 50 वर्षांमध्ये शरद पवार प्रचाराची फक्त शेवटची सभा घेत असत. पवारांचे सगळे प्रचार दौरे संपूर्ण महाराष्ट्र आणि काही प्रमाणात देशात होत असत. आपला बाकीचा पूर्ण दौरा आटोपला की शरद पवार शेवटच्या सभेसाठी बारामतीत येत आणि प्रचाराचा समारोप करत असत. तरी देखील पवार विक्रमी मतांनी निवडून येत. कारण बारामती पवारांचा बालेकिल्ला होता.
2019 आणि 2024 या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पवारांच्या बालेकिल्ल्याला तडे गेले. 2019 मध्ये बालेकिल्ला टिकवताना पवारांची दमछाक झाली, पण 2024 ने मात्र पवारांचा बालेकिल्ला ही बारामतीची ओळख उद्ध्वस्त करून टाकली. कारण शरद पवारांना आपल्या मुलीसाठी बालेकिल्ल्यामध्ये पायाला भिंगरी लावून प्रचार करावा लागला. बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत प्रत्येक विधानसभा क्षेत्रांमध्ये जाऊन अनेक सभा घ्याव्या लागल्या. बारामतीतल्या दुष्काळी गावांना भेटी देऊन तिथे पायधूळ झाडावी लागली. सभेमध्ये नागरिक न आल्याने शालेय विद्यार्थ्यांपुढे भाषणे करावी लागली. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला उरला नसल्याची सगळी लक्षणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिसली.
जे बारामतीत घडले तेच अमेठी आणि रायबरेली नावाच्या गांधी परिवाराच्या बालेकिल्ल्यांमध्ये घडले. एरवी संपूर्ण उत्तर प्रदेश पिंजून काढल्यानंतर गांधी परिवार शेवटच्या टप्प्यामध्ये अमेठी आणि रायबरेली येत असे. एखाद दोन बड्या रॅल्या केल्यानंतर दोन्ही मतदारसंघांमध्ये गांधी परिवाराचे सदस्य लाख – लाख मतांनी निवडून येऊन लोकसभेत पोहोचत असत.
2024 मध्ये मात्र अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांमध्ये प्रियांका गांधींना तब्बल 18 दिवस तळ ठोकावा लागला. या 18 दिवसांमध्ये प्रियांका गांधींना दोन्ही मतदार संघ मिळून किमान 25 सभा घ्याव्या लागल्या. यापैकी रायबरेलीतली शेवटची सभा सोनिया गांधींना घ्यावी लागली. “मी माझा मुलगा तुमच्या पदरात घालते, त्याला सांभाळा”, असे भावनिक उद्गार सोनिया गांधींना काढावे लागले. अमेठी आणि रायबरेली हे दोन लोकसभेचे मतदार संघ गांधी परिवाराचे बालेकिल्ले उरले नसून ते उद्ध्वस्त किल्ले झाले असल्याचे हे लक्षण ठरले.
आज याच दोन मतदारसंघांत गांधी परिवाराची परीक्षा होणार आहे. प्रियांका गांधींनी 18 दिवस तळ ठोकून पेपर लिहिल्यानंतर अमेठी आणि रायबरेली हे मतदार गांधी परिवार बालेकिल्ल्याच्या परीक्षेत पास होणार की नाही??, हे आज मतदानाद्वारे ठरवणार आहे. देशाच्या इतिहासातील बालेकिल्ला नावाची संकल्पनाच उद्ध्वस्त करणारी ही निवडणूक ठरणार आहे.
Gandhi family put on rigorous test in amethi and raibareli constituencies
महत्वाच्या बातम्या
- निकोबारमध्ये पोहोचला मान्सून, 31 मे रोजी केरळमध्ये पोहोचेल; महाराष्ट्रात 9 ते 16 जूनदरम्यान एंट्री
- 1 – 40 – 125 : हे आकडे पाहा आणि काँग्रेस नेत्यांच्या “भविष्यवाण्या” वाचा!!
- संसदेची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे बदलणार, CRPFची तुकडी आता कमांड सांभाळणार!
- पुंछमध्ये फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकू हल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे तीन कार्यकर्ते जखमी!