नाशिक : देशाच्या इतिहासात प्रथमच भारत मातेची तस्वीर शंभर रुपयांच्या नाण्यावर छापण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नाण्याचे अनावरण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त जे वैविध्यपूर्ण कार्यक्रम झाले, त्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम राजधानी दिल्लीत आंबेडकर ऑडिटोरियम मध्ये झाला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि एक स्वयंसेवक या नात्याने प्रथमच सहभागी झाले. संघाच्या शताब्दी निमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचे नाणे आणि डाक तिकीट जारी केले. त्यांची अनावरणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. संघाच्या अधिकृत कार्यक्रमामध्ये पंतप्रधान आणि स्वयंसेवक या नात्याने सहभागी झालेले नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले.
यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी अनेकदा संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. परंतु, त्यावेळी ते पंतप्रधान पदावर नव्हते. नरेंद्र मोदी मात्र पंतप्रधान पदावर असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीम बागेत गेले होते. तिथे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली अर्पित केली होती.
– सरकारी पातळीवरून अधिमान्यता
त्यानंतर आज शारदीय नवरात्राच्या महानवमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. याच कार्यक्रमात त्यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे 100 रुपयांच्या नाण्याचे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले. कुठलेही नाणे अथवा नोट ही रिझर्व बँक ऑफ इंडिया निर्माण करत असते आणि टपाल तिकीट हे केंद्र सरकारचे टपाल खाते निर्माण करत असते. त्यामुळे संघाच्या शताब्दी निमित्त निर्माण केलेली 100 रुपयांची नाणी आणि टपाल तिकिटे ही संघाला केंद्र सरकारने दिलेली मानवंदना मानण्यात येत आहे. या आधीच्या कुठल्याही सरकारांनी संघाला अशा प्रकारची अधिमान्यता आणि मानवंदना दिली नव्हती. ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या NDA सरकारने दिली.
– 100 रुपयांच्या नाण्यावर भारतमातेची प्रतिमा
शंभर रुपयांच्या नाण्यावर एका बाजूला राजमुद्रा तर आहेच, पण दुसऱ्या बाजूला सिंहाबरोबर भारतमातेची वरद मुद्रेतील प्रतिमा आहे. देशाच्या इतिहासात संभवत: प्रथमच भारत मातेची प्रतिमा अधिकृत नाण्यावर अंकित केल्याची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात दिली. त्याचबरोबर 1963 मध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभाग घेतला होता, त्याचा फोटो टपाल तिकिटावर छापण्यात आला आहे, ही माहिती देखील पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात दिली.
एकेकाळचा वाद, आज एकही नाही आवाज
एकेकाळी संघ आणि जनता पक्ष अशा दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर संपूर्ण देशभर प्रचंड वाद होऊन जनता पक्षाचे सरकार गेले होते किंबहुना समाजवाद्यांनी ते घालविले होते. संघाला आणि त्याच्या ध्येयाला समाजवाद्यांनी आणि काँग्रेसींनी पूर्णपणे “अस्पृश्य” ठरविले होते. संघाच्या कार्यक्रमात सरकारचा सहभाग तर दूरच, पण सरकारमध्ये सहभागी असलेल्या मोर्चा स्वयंसेवकांना सुद्धा संघाच्या कार्यक्रमात सरकारी प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हायला समाजवाद्यांनी आणि काँग्रेसींनी पूर्ण प्रतिबंध केला होता. तो काही काळ मान्य करावा लागला होता. पण नंतर कालचक्र असे काही फिरले की खुद्द केंद्रीय सरकारनेच नाणी आणि टपाल तिकीट अशा दोन प्रतिकांच्या निर्मितीतून संघाला आणि संघाच्या ध्येयाला अधिमान्यता आणि मानवंदना दिली. पण यावेळी त्याच्या विरोधात देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातून आवाज सुद्धा निघाला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App