नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानशी चर्चेचे सगळेच प्रस्ताव धुडकावल्यानंतरही पाकिस्तानी पंतप्रधान सौदी अरेबियात “शोधताहेत” चर्चेसाठी “तटस्थ” जागा!! अशी वेळ पाकिस्तानवर आली आहे.
पाकिस्तानशी कुठली चर्चा झालीच, तर ती पाकिस्तान व्याप्त काश्मीर मोकळा करून तो भारताला सोपविण्यावरच होईल. अन्य कुठल्या विषयांवर चर्चा होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार स्पष्ट केले, तेच आज बिकानेर मधल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा सांगितले. पण तरी देखील पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ भारताशी चर्चेची आस लावून बसले.
पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखत देताना शहाबाज शरीफ यांनी भारताशी पाकिस्तानची चर्चा होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेसाठी मध्यस्थी करायची तयारी दाखवली तरी ती भारताला मान्य होणार नाही, याची कबुली शहाबाज शरीफ यांनी दिली. पण त्याचवेळी भारताला पाकिस्तान मध्ये येऊन अथवा भारतात पाकिस्तानचे प्रतिनिधी जाऊन चर्चा नको असेल, तर ती तिसऱ्या “तटस्थ” ठिकाणी घेण्याची पाकिस्तानची तयारी असल्याची माहिती त्यांनी दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सौदी अरेबियात कुठेही “तटस्थ” ठिकाणी चर्चा होऊ शकेल, असे शहाबाज शरीफ म्हणाले. पण भारताशी चर्चा सुरू होण्याचा कुठलाही मागमूस नसताना त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांना पाकिस्तानचे मुख्य प्रतिनिधी म्हणून देखील नेमून टाकले.
– प्राधान्यक्रमात “पाकिस्तानी चलाखी”
त्याचवेळी शहाबाज शरीफ यांनी भारताशी चर्चा करण्याचे पाकिस्तानचे प्राधान्यक्रम स्पष्ट केले. पाकिस्तान भारताशी काश्मीर, पाणीवाटप, व्यापार आणि दहशतवाद या चार मुद्द्यांवर चर्चा करू इच्छितो, असे ते म्हणाले. मात्र हा प्राधान्यक्रम ठरविण्यात शहाबाज शरीफ “पाकिस्तानी चलाखी” केली. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानची चर्चा करायची नाही, अशी भारताने जाहीर भूमिका घेतली असताना देखील शहाबाज शरीफ यांनी पाकिस्तानचा पहिला प्राधान्यक्रम काश्मीर मुद्द्याच्या चर्चेला दिला. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले. पाकिस्तान पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तरसला. त्यामुळे शरीफ यांनी पाणीवाटप या विषयाला दुसरे प्राधान्य दिले. कोणत्याही स्थितीत दहशतवाद थांबविणे हा भारताचा सगळ्यात मोठा आणि पहिला प्राधान्यक्रम असताना दहशतवादाच्या मुद्द्याला पाकिस्तानच्या प्राधान्यक्रमात शेवटच्या म्हणजे चौथ्या क्रमांकावर ठेवले.
वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची ठाम भूमिका जाहीर करून रक्त आणि पाणी दहशतवाद आणि चर्चा एकत्र वाहणार नाही आणि होणार नाही असे वारंवार सांगितले. राजस्थान मधल्या बिकानेर मध्ये आज पुन्हा त्यावर शिक्कामोर्तब केले. तरी देखील पाकिस्तानी पंतप्रधानांनी पाकिस्तानी माध्यमांना मुलाखत देऊन भारताशी चर्चा करायची तयारी दाखवली. पण चर्चेचा प्राधान्यक्रम ठरवताना “चालूपणा” केला. त्यामुळे पाकिस्तानचा भेसूर दहशतवादी चेहरा पुन्हा सगळ्या जगासमोर उघडा पडला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App