विशेष प्रतिनिधी
मुंबई : Election Commission राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत दुबार मतदारांच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार करण्यात आले असल्याचे निवडणूक आयुक्तांनी दिले आहे. तसेच या मतदारांशी संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.Election Commission
विरोधकांनी निवडणुकांमध्ये दुबार मतदान झाल्याचे तसेच बोगस मतदान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर तसेच निवडणूक आयोगावर देखील टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यात प्रामुख्याने उपस्थित केला गेलेला प्रश्न होता दुबार मतदारांचा. यावर निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी सविस्तर उत्तर दिले आहे.Election Commission
दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी टूल तयार
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, निवडणूक आयोगाने दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार केले आहे. त्यानुसार, ज्या मतदारांची दुबार नावे आहेत, त्या ठिकाणी दोन स्टार्स असतील. या मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या मतदाराला त्याला कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे हे विचारले जाईल. त्यानंतर त्यांनी पसंती दर्शवलेल्या मतदान केंद्रांवर त्यांना मतदान करता येईल. अशा प्रकारे दुबार मतदारांना एकाच मतदान केंद्रांवर मतदान करता येईल, अशी माहिती वाघमारे यांनी दिली आहे.
तसेच संबंधित मतदाराने काहीही संपर्क केला नाही, तर सगळ्या मतदान केंद्रांवर डबल स्टार मतदार अशी नोंद केली जाईल. त्यानंतर हा मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आला तर त्याच्याकडून मी दुसऱ्या कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करणार नाही किंवा केले नाही असे प्रतिज्ञापत्र घेतले जाईल, असेही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्तांनी दुबार मतदारांच्या प्रश्नी उत्तर दिल्यानंतर उपस्थित पत्रकाराने प्रश्न केला की लोकसभा आणि विधानसभेत दुबार मतदान झाले आहे हे तुम्ही मान्य करता का? यावर आयुक्तांनी उत्तर देणे टाळले. लोकसभा आणि विधानसभेवर मी काही बोलणार नाही, असे त्यांनी उत्तर दिले. त्यानंतर उत्तर भारतीय विकास सेनेचे नेत्याने मध्येच निवडणूक चिन्हाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पत्रकारांनी ही पत्रकार परिषद असून तुम्ही पत्रकार नसल्याचे म्हणत त्यांना खाली बसवले.
मतदारांचा सध्या रोष आहे, त्यांची नावे गाळली आहेत किंवा दुबार आलेली आहेत, अशा कठीण प्रसंगी तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला ही निवडणूक आणखी पुढे ढकलावी अशी मागणी का केली नाही? असा सवाल यावेळी पत्रकाराने उपस्थित केला. यावर बोलताना आयुक्त म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 च्या सर्व निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे.
महिलांसाठी खास गुलाबी मतदान केंद्र
दरम्यान, यंदा महिलांसाठी खास गुलाबी मतदान केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 कॅम्पेन बनवण्यात आल्याचीही माहिती दिली. दिव्यांग मतदार, लहान बाळासह स्त्रिया, ज्येष्ठांना पहिल्यांदा मतदान करू दिले जाईल. अनेक ठिकाणी गुलाबी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर सर्व अधिकारी व कर्मचारी या महिला असतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App