विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चांगले प्रशासन, भ्रष्टाचार मुक्त कारभार वगैरे मुद्द्यांवर सुरू झालेली दिल्लीची निवडणूक अखेर यमुनेच्या पाण्यात बुडाली. किंबहुना ती सत्ताधाऱ्यांनीच बुडवली. म्हणूनच बाकी सगळे मुद्दे बाजूला सारून यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा “साक्षात्कार” अरविंद केजरीवालांना झाला आणि त्यातून यमुनेचे पाणी एकमेकांना पाजायचा चंग बांधला गेला. पण अखेरीस 4 फेब्रुवारीला दिल्लीचे जनता नेमकी कोणाला पाणी पाजणार हे 8 फेब्रुवारीला नेमके समजणार आहे.Delhi assembly elections
हरियाणाच्या पानिपत मधून दिल्लीमध्ये येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात अमोनियाची मात्रा जादा मिसळून दिल्लीकरांना विषारी पाणी पाजले जात आहे, असा खळबळजनक आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी नायब राज्यपालांना तसे पत्र लिहिले. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, निवडणूक आयुक्त राजीव कुमार, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यमुनेचे पाणी पिऊन दाखवावे, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले. त्यावर भाजपशासित राज्यकर्ते आणि काँग्रेसचे नेतेही संतापले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी केजरीवाल यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. नायब सिंग सैनी यांनी तर थेट यमुनेत उतरून यमुनेचे पाणी हाताने प्यायले. नदीच्या पाण्यात आम्ही विष मिसळत नाही. नदी आमच्या संस्कृतीमध्ये माता मानली गेली आहे. आम्ही नदीची पूजा करतो. कारण आमच्यावर तसे संस्कार आहेत, अशा शब्दांमध्ये नायब सिंग सैनी यांनी केजरीवाल यांना उत्तर दिले. त्यांच्या जोडीला आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा देखील आले. त्यांनी केजरीवालांना ठोकून काढले.
राहुल गांधी यांनी देखील केजरीवाल यांच्यावर त्याच मुद्द्यावर तोंडसुख घेतले. फक्त त्याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदींना देखील घेरले. नरेंद्र मोदी जसे नेहमी खोटे बोलतात, तसेच आता अरविंद केजरीवाल खोटे बोलायला लागलेत. स्वतः केजरीवाल करोडो रुपयांच्या शीश महल मध्ये ऐशआरामात राहून शुद्ध पाणी पितात आणि दिल्लीकरांना प्रदूषित पाणी प्यायला लावतात, असा आरोप राहुल गांधींनी केला.
पण दिल्लीची निवडणूक तर फ्री रेवडी वाटप भ्रष्टाचार मुक्त कारभार वेगवेगळ्या गॅरेंट्या यांनी सुरू झाली होती, पण ती स्पर्धा फारच वाढल्याने अखेरीस केजरीवालांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळण्याचा विषय काढून अख्खी निवडणूक पाण्यात बुडवली. आता दिल्लीची जनता नेमके कुणाला यमुनेच्या पाण्यात बुडवणार आणि कुणाला पाणी पाजणार हे लवकरच समजणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App