नाशिक : JNU मधल्या 7700 मतदारांच्या तळ्यातून मार्क्सवादी यंग ब्रिगेडने थेट बंगालच्या कोट्यावधी मतदारांच्या महासागरात उड्या घेतल्या आहेत. एकेकाळी बंगालवर अधिराज्य गाजवलेले मार्क्सवादी लोकसभा निवडणुकीत बंगाल मधून “गायब” झाले असल्याचे चित्र राष्ट्रीय पातळीवर दिसत असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र मार्क्सवादी कम्युनिस्टांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 24 तरुण नेते लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्या ना कुठल्या राजकीय प्रक्रियेत सामावून घेतले आहेत आणि या प्रत्येकाचा दिल्लीतल्या सु आणि कुप्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी संबंध आहेच!! CPI(M) banks on young brigade from JNU in loksabha elections!!
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे लोकशाही प्रशिक्षणाचे प्रचंड मोठे “आगार” मानले जाते. देशाची लोकसभा निवडणूक किंवा कुठल्याही मोठ्या राज्याची विधानसभा निवडणूक जेवढी गाजते किंवा गाजवली जाते, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा अधिक जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची निवडणूक गाजते किंवा गाजविली जाते. कारण देशाच्या निवडणुकीत जरी 97 कोटी मतदार असतील, तरी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या निवडणुकीत बिलकुलच कमी मतदार नाहीत. त्या विद्यापीठाच्या निवडणुकीत “तब्बल” 7700 नोंदणीकृत मतदार आहेत आणि तिथे 75 ते 80% वगैरे मतदान होत असते. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे देशातल्या लोकशाही प्रशिक्षणाचे “आगार” मानले जाते.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांना राजकीय दृष्ट्या पूर्ण उखडून टाकल्यानंतर मार्क्सवादी गोटातले सगळे जुने जाणते नेते राजकीय रद्दी डेपोत गेले, पण म्हणून मार्क्सवाद्यांची बंगाल मधली पाळेमूळे पूर्ण खणली गेली, असे मानायचे कारण नाही. मार्क्सवाद्यांमधले मधल्या फळीतले नेते तिथे तग धरून राहिले आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, रेवोल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली. यातूनच त्यांनी जवाहरलाल नेहरू या सु आणि कुप्रसिद्ध विद्यापीठातले “तब्बल” 24 तरुण नेते कम्युनिस्ट आघाडीतून लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेत सामील करून घेतले.
यातली वानगी दाखल नावे सांगायची झाली तर दीपसीता धर, ओईशी मुखर्जी, प्रतिकूर रहमान, कलतान दासगुप्ता, सायरा शाह हलिम, सायनी घोष, आदी तरुण नेत्यांना मार्क्सवाद्यांनी थेट लोकसभा निवडणुकीच्या रणमैदानात उमेदवारी देऊन उतरवले. या सगळ्यांचा केव्हा ना केव्हातरी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी संबंध आला. तिथेच त्यांनी लोकशाही राबविण्याचे “धडे” गिरवले. आता त्या धड्यांच्या अभ्यासाचा पश्चिम बंगाल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोट्यावधी मतदारांना सामोरे जाताना कितपत उपयोग होईल याचा निकाल 4 जूनला लागेल.
पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी तिथल्या “लोकशाहीच्या प्रयोगशाळे”तून बाहेर आणून प्रत्यक्ष लोकशाहीच्या मैदानात उतरवण्याचा प्रयोग मार्क्सवाद्यांसाठी नवीन नाही. किंबहुना तो कुठल्याच पक्षासाठी तसा नवीन नाही, पण त्यातल्या त्यात डाव्या पक्षांसाठी तर तो बिलकुलच नवीन नाही. आता देखील दिल्लीतून कन्हैया कुमार आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे बंगालमधून काही तरुण नेते काँग्रेस आणि मार्क्सवाद्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलेच आहेत.
याआधी आईशी घोष या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थिनी प्रतिनिधीला मार्क्सवाद्यांनी बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत उतरवले होते, परंतु फक्त 43 हजार मते घेऊन तिचा पराभव झाला होता. कन्हैया कुमारचा बेगूसराय लोकसभा मतदारसंघात साडेतीन लाख मतांनी पराभव झालाच होता.
पण तरीदेखील लोकशाहीच्या देशव्यापी प्रयोगाला न घाबरता मार्क्सवाऱ्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा प्रयोग राबविलाच. “तब्बल” 7700 मतदारांना सामोरे जाण्याचा बौद्धिक अनुभव असणाऱ्या तरुण नेत्यांना बंगालच्या कोट्यावधी मतदारांना सामोरे जाण्यासाठी मार्क्सवाद्यांनी निवडणुकीच्या रणमैदानात उतरवले आहे. 4 जूनला त्यांचा निकाल लागणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App