विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाच्या पुढे झुकण्याची परंपरा जुनी आहे. पण काँग्रेस नेते उदित राज यांनी लोचटगिरीची कमाल केली आहे. राहुल गांधी जर ओबीसींच्या हक्कांसाठी लढले, तर ते ‘दुसरे आंबेडकर’ ठरू शकतात,” असे विधान उदित राज यांनी केले आहे.
उदित राज यांनी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या अकलेचे तारे तोडल्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपने या वक्तव्याला “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाचा अपमान” म्हटले आहे. उदित राज यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “ओबीसींनी राहुल गांधींच्या विचारांचा अवलंब केल्यास ते दुसरे आंबेडकर ठरू शकतात.” राहुल गांधींनी नुकतीच एका भाषणात कबुली दिली होती की यूपीए सरकारच्या काळात जातनिहाय जनगणना न करणे ही चूक होती. त्यांना त्यावेळी ओबीसींच्या समस्या पुरेशा प्रमाणात समजल्या नव्हत्या.
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी इतकी वर्षं का वाट पाहिली? त्यांच्या संविधानाची अंमलबजावणी जम्मू-काश्मीरमध्ये इतक्या उशिरा का झाली? असा सवाल त्यांनी केला.
पूनावाला यांनी काँग्रेसला सवाल केला की, “जर आता राहुल गांधींना दुसरे आंबेडकर बनवायचे असेल, तर त्याचा अर्थ असा नाही का की काँग्रेसला वाटते पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि अन्य नेत्यांनी ओबीसींचा आदर केला नाही?”
सोशल मीडियावरही यावरून टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. अनेक युजर्सनी राहुल गांधींच्या आंबेडकरांशी तुलना करण्यावरून संताप व्यक्त करत हा इतिहासाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काहींनी हे काँग्रेसचे ‘ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचे’ अपयशी प्रयत्न असल्याची टिप्पणी केली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेस आता ओबीसी मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी नव्या प्रकारची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आंबेडकरांसारख्या महामानवाची तुलना कोणत्याही नेत्याशी होणे, हे राजकीय दृष्टिकोनातून अपमानकारक आहे, असे मत देखील व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App