विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बद्दल प्रश्न येणार याची मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी एक शेर लिहून आणला होता. तो त्यांनी पत्रकारांना वाचून दाखवला. प्रत्येक वेळी तुमच्या अपूर्ण इच्छांचे खापर आमच्यावर फोडू नका अशा आशयाचा तो शेर होता!!Chief Election Commissioner’s challenge to the opposition
निवडणूक निकाल तुमच्या बाजूने लागले की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चांगले आणि तुमच्या बाजूने निकाल लागले नाहीत की तेच मशीन वाईट ही भूमिका बरोबर नाही, असे त्यांनी विरोधकांना सुनावले. आत्तापर्यंत कितीतरी निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या द्वारेच मतदारांनी सरकारी बदलली याची आठवण देखील त्यांनी विरोधकांना करून दिली.
ईव्हीएम मशिनबाबत विविध माध्यमातून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. आजही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असताना यामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावर प्रश्न उपस्थित केला. यावर राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
हा प्रश्न येऊ शकतो हे लक्षात घेत त्यांनी त्यावर एक शेरही लिहिला आणि तो पत्रकार परिषदेत सादर केला. अधुरी हसरतो का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नही, वफा खुद से नही होती खता ईव्हीएम की करते हो!!
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, ईव्हीएमबाबत मी अनेकदा सांगितलं आहे. पण परत एकदा प्रश्न विचारला आहे तर मी पुन्हा सांगतो. सध्या याविरोधात अभियान देखील सुरु आहे सोशल मीडियावर तर मी सांगूनच टाकतो. देशातील संविधानिक कोर्टांनी अर्थात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांनी ईव्हीएमवरील तक्रारींवर ४० वेळा भाष्य केले आहे.
ईव्हीएमच्या तक्रारी काय आहेत?
हे हॅक करता येतात, याची चोरी होऊ शकते, १९ लाख मशिन हरवल्या आहेत, यामध्ये मतदान दिसत नाही, कॉम्प्युटरनं ही खराब होऊ शकते, निकाल बदलू शकतो, यात छेडछाड होऊ शकते, अशा प्रकारच्या तक्रारी ईव्हीएमविरोधात आल्या आहेत. यामध्ये कोर्टानंही निकाल देताना या सगळ्या तक्रारी खोडून काढल्या आहेत.
कोर्टानं म्हटलंय की, या मशिनला व्हायरस लागूच शकत नाही, यामध्ये मतं बाद होऊच शकत नाहीत, छेडछाड होऊ शकत नाही, ईव्हीएम हे फुलप्रुफ डिव्हाईस आहे, आम्हाला कोर्टानं एका ऐवजी पाच व्हीव्हीपॅट मोजायला सांगितले ते आम्ही केले. आता परत तक्रारी यायला लागल्या तर दिल्ली हायकोर्टानं तक्रारदारावर दंड लावायला सुरुवात केली आहे. नुकतेच सुप्रीम कोर्टानंही अशाच एका याचिकेवर निकाल दिला आहे.
निवडणूक आयोगाकडं तक्रारी करा
तुम्हाला काही तक्रारी असतील तर आम्हाला विचारा. कोणी पण येतंय आणि ईव्हीएमचा मुद्दा सोशल मीडियावर घेऊन बसतं. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची तर आता डिग्री पण तपासायला पाहिजे. जेव्हा पण तुम्ही आम्हाला ईव्हीएमबाबत प्रश्न विचाराल तर तो प्रश्न आम्ही एफएक्यू (FAQ) मध्ये टाकू, यामध्ये सध्या 100 पेक्षा अधिक प्रश्न आहेत, असंही यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
किती वेळा ईव्हीएमनं सत्ताधाऱ्यांना हरवलं?
ईव्हीएम संदर्भात यामध्ये जेवढी कायदेशीर प्रकरणं झालीत या ४० प्रकरणांवर आधारित आम्ही एक पुस्तक तयार केलं आहे. यामध्ये एफएक्यूज आहेत. आमच्या वेबसाईटवरही आहे हे पुस्तक. यामध्ये चार्ट देखील आहे. यात किती वेळा सत्तेत असलेल्या पक्षाला ईव्हीएमनं बदलून टाकलं आहे, याचा उल्लेखही आहे. मला वाटलंच होतं काल रात्री की यावर एकतरी प्रश्न येईल. त्यामुळे मी रात्री एक ओळ लिहिली, ती वाचून दाखवतो.
अधुरी हसरतो का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नही! वफा खुद से नही होती खता ईव्हीएम की कहते हो!!, पण जेव्हा निकाल येतात तेव्हा मात्र तुम्ही आपल्या आरोपांवर ठाम राहत नाहीत, कारण निकाल तुमच्या बाजूने लागलेला असतो. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की, ईव्हीएम हे पूर्णपणे सुरक्षित आहे. यात वेळोवेळी आम्ही अनेक नव्या सुधारणा केल्या आहेत. आता तर प्रत्येक ईव्हीएमचा नंबर तो ज्या बुथवर जाईल तो उमेदवाराला दिला जाईल, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App