विशेष प्रतिनिधी
नाशिक : छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारले म्हणून ते नाराज असल्याच्या बातम्या सगळ्या मराठी माध्यमांनी चालविल्या, पण नाशिकमध्ये भुजबळ आल्यानंतर त्यांनी उघडपणे अजितदादा + प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी कशा गेमा केल्या आणि छगन भुजबळ यांना हातातले खेळणे कसे बनवले, हेच संतापाने पत्रकारांना सांगून टाकले.
भुजबळ हे खरोखरच मंत्रिपदासाठी नाराज आहेत का?? असा सवाल छगन भुजबळ यांना केला असता, त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना वेगळाच गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली.
छगन भुजबळ म्हणाले :
मी अनेक पदं भूषविली आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदही भूषविलं आहे. मी काही मंत्रिदावरून नाराज नाही. मला ज्या पद्धतीने पक्षात वागणूक दिली जात आहे. त्यामुळे मी नाराज आहे. मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का??
मी ज्येष्ठ आमदार आणि मंत्री आहे. मी शोभेचं मंत्रिपद स्वीकारलं नाही. मंत्री म्हणून मी नेहमीच एक्टिव्ह राहिलो. त्यामुळे केवळ शोभेसाठी मंत्रिपद घेतलं नाही. या निवडणुकीत ओबीसी समाज महायुतीच्या पाठी होता. लाडकी बहीण होती. त्यामुळे आम्हाला प्रचंड बहुमत मिळालं. आम्हाला वाटलं राष्ट्रवादीचे 30 आमदार कसे तरी येतील. एकदम 40 आले. बाकीच्या पक्षांचेही आमदार आले. असं असताना मला डावलण्याचं काही कारण नव्हतं. मंत्रिमंडळात जुनं आणि नवीन यांचा मेळ घालावा लागतो. जुने झाले द्या फेकून असं चालत नाही.
Maharashtra cabinet expansion : पहिल्याच झटक्यात 39 मंत्र्यांसह फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार; नव्यांच्या समावेशाने मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलला!!
नाव जाहीरच केलं नाही
लोकसभा निवडणुकीला मला उभं राहायंच नव्हतं, तरीही मला उभं राहायला सांगितलं. मी तयार झालो. त्यानंतर मी माझ्या मतदारसंघात मेहनत घेतली. तयारी करूनच अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना भेटायला गेलो. पण त्यावेळी त्यांनी चुप्पी साधली. अजितदादा, तटकरे, पटेल सांगायचे तुम्ही लढलं पाहिजे. मोदी आणि अमित शाह यांचा निरोप आहे. त्यामुळे मी राहिलो उभा. नंतर यांनी माझं नाव जाहीर केलं नाही. एक महिना झाला तरी नाशिकमधून माझं नाव जाहीर केलं नाही. माझं ह्युमुलिएशन सुरू होतं. त्यामुळे मीही मग लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला.
राज्यसभेच्या दोन जागा होत्या. त्यातील एक जागा सुनेत्राताईंना सोडली. नितीन पाटील यांना दुसरी जागा दिली. काय तर म्हणे, तुला खासदार करेन असं मी नितीन पाटील यांना जाहीर सभेत सांगितलं होतं. त्यामुळे त्याला राज्यसभा दिली. मी मनात म्हटलं, अरे वा… त्यावेळी मला राज्यसभा दिली नाही. नंतर मला म्हणाले, तुम्ही विधानसभा लढवा. तुमच्यामुळे पक्ष मजबूत होईल. मी राहिलो उभा. मनोज जरांगे पाटील सकाळी 10 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत माझ्या विरोधात फिरत होते. त्यामुळे फरक पडला. माझं 30000 ने मताधिक्य घटलं. कांटे की टक्कर झाली. पण मी निवडून आलो.
आता मंत्रिपदाची शपथ घेण्याची वेळ आली तेव्हा म्हणाले राजीनामा द्या, राज्यसभेवर जा. आम्ही नितीन पाटीलचा राजीनामा घेतो. का तर त्यांच्या भावाला मकरंदला मंत्री करायचं आहे. मला काय लहान पोरासारखं खेळवता?? मी खेळणं आहे का तुमच्या हातातील?? अॅडजस्टमेंट करायची म्हणून राजीनामा द्यायला सांगता? मान नाही तिथे सोन्याचं पान दिलं तरी काय करायचं मला?? असा भावनिक सवालही त्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App