जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर राहुल गांधींचा विजय झाला, असे ढोल काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पिटले असले, तरी प्रत्यक्षात जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा राजकीय आणि सामाजिक बारकावा लक्षात घेतला, तर मोदींचे “कमंडल” राजकारण यशस्वी आणि त्यानंतर “मंडल” राजकारणात एंट्री याच शब्दांमध्ये संबंधित निर्णयाचे वर्णन करावे लागेल.
जातनिहाय जनगणनेचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे की नाही हा भाग अलहिदा, पण मोदींनी तो विशिष्ट विचार विनिमयानंतर घेतला आणि त्यामध्ये काँग्रेसच्या दबावाच्या राजकारणाचा कुठलाही सहभाग नाही, याविषयी कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही. कारण मोदींचे कुठलेच निर्णय विशिष्ट विचार विनिमय केल्याशिवाय आणि self conscious consideration शिवाय घेतलेले नसतात, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे काँग्रेसने राहुल गांधींच्या यशाचे कितीही ढोल पिटले आणि संजय राऊत यांनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहून राहुलच्या यशाचा ताशा वाजविला, तरी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे यश काँग्रेस किंवा संजय राऊत यांचे नाही. त्यामागे मोदींचा निश्चित स्वरूपाचा विशिष्ट विचार दडला आहे, हे मान्य करावे लागेल.
1990 च्या दशकामध्ये राम मंदिराच्या आंदोलनाने गती पकडली त्यावेळी भारतीय प्रसार माध्यमांनी त्याचे वर्णन “कमंडल राजकारण” असे केले होते. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल कमिशनचा रिपोर्ट लागू करायची घोषणा केली. त्यामुळे प्रसार माध्यमांनी “मंडल” विरुद्ध “कमंडल” अशी भाषा वापरून विशिष्ट राजकीय संकल्पना त्या कालावधीत भारतीय जनमानसात रुजविल्या होत्या. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन मंडल आयोग लागू केला, असा त्यावेळी दावा केला गेला होता. त्यामुळे विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या राजकारणाला छेद देण्यासाठी लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली श्रीराम रथयात्रा काढण्यात आली. ते “मंडल” विरुद्ध “कमंडल” असे राजकारण होते असे वर्णन त्यावेळी प्रसार माध्यमांनी केले होते. ते सगळे जसेच्या तसे खरे होते, असे समजयचे कारण नसले, तरी “मंडल” विरुद्ध “कमंडल” ही संकल्पना त्यावेळी भारतीय जनमानसात रुजली होती हे नाकारायचे कारण नाही.
मग आजच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा त्याच पार्श्वभूमीवर किंवा त्या संकल्पनांच्या आधारे विचार केला, तर भाजप आणि संघ परिवाराने त्यावेळी सुरू केलेले “कमंडल” राजकारण मोदींनी यशस्वी करून दाखविले. राम मंदिर बांधून दाखविले आणि आता त्यांनी “मंडल” या संकल्पनेत आपल्या राजकारणाची एन्ट्री करून घेतली, असे म्हणावे लागेल.
{मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपचा OBC हा समाज घटक सर्वांत मोठा जनाधार आहे हे लक्षात घ्यावे लागेल.}
अर्थातच मोदींची ही “मंडल” राजकारणातली एन्ट्री ती काही नवी नाही त्यामुळे ती राहुल गांधी किंवा अन्य कुठल्या विरोधकांच्या दबावापोटी केली असेल, असे बिलकुल समजायचे कारण नाही. उलट तसे समजणे हे मोदींचे राजकारण उमजून घेण्यातले सगळ्यात मोठे अज्ञान ठरेल.
कारण मोदींनी आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यात स्वतःची कुठल्याही नेत्याच्या मागे राजकीय फरफट होऊ दिली, असे अजिबात दिसलेले नाही. उलट मोदींनी अजेंडा सेट करायचा आणि बाकीच्या पक्षांनी किंवा नेत्यांनी त्यांच्या मागे धावत सुटायचे, असेच आतापर्यंत घडले आहे. म्हणूनच मोदींनी “मौत के सौदागर” आणि “नीच” या शिव्या युक्त संकल्पनांवर मात करून आपले राजकारण यशस्वी करून दाखविले. मग मोदींनी राहुल गांधी किंवा अन्य विरोधकांच्या दबावापोटी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला, असे कसे मान्य करता येईल??, हा कळीचा सवाल आहे आणि त्याचे उत्तर “नाही” याच शब्दाने प्रामाणिकपणे देता येण्यासारखे आहे.
– काँग्रेसची रणनीती उघड्यावर
मग हा जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेऊन मोदींना काय साध्य करायचे आहे??, हा सवाल समोर येतो आणि त्याचे उत्तर कुणाकडेही “रेडीमेड” उपलब्ध नाही. कारण मोदींनी जातनिहाय जनगणनेचे निकष किंवा प्रश्नावली अजून जाहीरच केलेली नाही. पण त्यापलीकडे जाऊन जर जातनिहाय जनगणना होणारच असेल, तर ती हिंदू समाजाबरोबरच बाकीच्या समाजाची ही जातनिहाय जनगणना होईल, याविषयी शंका बाळगायचे कारण नाही. कारण हिंदू समाजात जातीच्या आधारावर फूट पाडण्यासाठी जर काँग्रेस आणि बाकीचे विरोधक जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्याचा वापर करत असतील, तर मोदी आपल्या विशिष्ट पद्धतीने त्याला छेद दिल्या वाचून राहणार नाहीत, हे अनुभवाच्या आधारे सांगता येईल. म्हणूनच मोदींनी जातनिहाय जनगणनेचे निकष आणि प्रश्नावली अद्याप जाहीर न करून काँग्रेसची घायकुती वाढविली आहे. काँग्रेसला कोणत्या आधारे जातनिहाय जनगणना हवी??, त्यातून आरक्षण किती टक्के वाढवायचे आहे, वगैरे बाबी राहुल गांधींनी काल जाहीरपणे सांगितले. त्याच आज पुन्हा मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांनी रिपीट केल्या. त्यामुळे काँग्रेसची रणनीती “उघड्यावर” आली.
आता इथून पुढे मोदी जातनिहाय जनगणनेची स्वतःची “मोडस ऑपरेंडी” ठरविणार आहेत. याचा नेमका अर्थ समजून घेण्याची गरज आहे. मोदींचा कुठलाही “पॉलिटिकल शॉट” हा सहज सोपा आणि स्ट्रेट ड्राईव्ह सारखा मारलेला नसतो हा अनुभव लक्षात घेता, पुढे नेमके काय होईल??, याचा कयास बांधावा लागेल, पण मोदींचा निर्णय काँग्रेस आणि विरोधकांना अनुकूल ठरणारा नसेल, तर तो जातींमध्ये फूट पाडायचा नॅरेटिव्ह उद्ध्वस्त करणारा असेल एवढे मात्र निश्चित!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App