नाशिक : ठाकरे बंधूंना भाजपचा मुद्द्यांचा इंधन पुरवठा; राजकारणाच्या या धबडग्यात काँग्रेस आणि पवारांना आपल्या पक्षांमध्ये नेते टिकवता येईनात!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झालीय.
हिंदी सक्तीचा मुद्दा उकरून काढून भाजपने ठाकरे बंधूंना मुद्द्याचा इंधनपुरवठा केला. त्यांचे ऐक्य साधले. त्यामुळे त्यांचा राजकीय हुरूप वाढला. राज ठाकरेंनी मीरा भाईंदर मध्ये जाऊन मोठे भाषण केले. उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत देऊन ठाकरे ब्रँडचा ढोल वाजवला. ठाकरे बंधूंच्या भाषणावर आणि मुलाखतीवर भाजपच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया देऊन राजकीय आगीत जास्त इंधन ओतले. निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंचा व्हिडिओ शेअर करून मैने राज ठाकरे को हिंदी सिखाया अशा बाता मारल्या. मुंबई गुजरात्यांचीच होती आणि आहे. मुंबईत 30 – 32 % च मराठी आहेत, असे सांगून पुन्हा ठाकरे बंधूंना डिवचले. महाराष्ट्रात आता ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लांबलचक पोस्ट लिहून उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीकास्त्र सोडले.
या सगळ्यातून भाजपने ठाकरे बंधू भाजप विरोधातल्या “केंद्रस्थानी” राहतील, याची व्यवस्था केली.
– काँग्रेस आणि पवारांचा पक्ष संदर्भहीन
पण या सगळ्यांमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांची पुरती गोची झाली. महाराष्ट्रातल्या राजकारणात भाजप आणि ठाकरे बंधू यांच्यातल्या घमासानात त्यांना कुठे स्थानच उरले नाही. वास्तविक काँग्रेसकडे 13 खासदार आहेत आणि शरद पवारांकडे आठ खासदार आहेत. पण एवढे संख्याबळ असूनही हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या संदर्भहीन बनत चालले. दोन्ही पक्षांना नेते टिकवणे अवघड होऊन बसलेय. मध्यंतरी वसंतदादांचे सगळे घराणे भाजपमध्ये निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ आता करवीरचे राहुल पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादीत निघून चाललेत.
– काँग्रेस आणि पवारांना गळती रोखता येईना
तिकडे दौंड मध्ये रमेश थोरात शरद पवारांची साथ सोडत आहेत त्याचबरोबर फक्त विधानसभेच्या तिकिटासाठी शरद पवारांकडे गेलेले हर्षवर्धन पाटील देखील शरद पवारांना सोडण्याच्या मूडमध्ये आलेत. काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडे आता राजकीय दृष्ट्या काही देण्यासारखे उरले नाही हे लक्षात घेऊन त्यांचे नेते एकापाठोपाठ एक बाहेर पडत आहेत. काँग्रेसच्या 13 खासदारांचा काही उपयोग नाही. शरद पवारांच्या आठ खासदारांचाही इकडे किंवा तिकडे उपयोग शिल्लक नाही. जो काही उपयोग करायचा तो केंद्रात नरेंद्र मोदींनी करवून घेतला आणि आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना संदर्भहीन करून सोडत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App