विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह आणि विद्यमान राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या एका वक्तव्याने फडणवीस सरकारची पुरती गोची झाली, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारची ठाम भूमिका सांगून सुटका करवून घेतली.
मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना भैय्याजी जोशी यांनी मुंबईची एकच भाषा नाही. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मुंबईत अनेक भाषा बोलल्या जातात. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी आलेच पाहिजे असे नाही, असे वक्तव्य केले. त्यामुळे मोठा वाद उफाळला. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना भाजपला आणि फडणवीस सरकारला घेरण्याची संधी मिळाली. ती त्यांनी पुरेपूर उचलली. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यानिमित्ताने सरकारला ठोकून काढले.
विरोधी पक्षनेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत भैय्याजींच्या वक्तव्याचा उल्लेख करून सरकारला टोमणे मारले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका ठामपणे सांगून सुटका करवून घेतली. महाराष्ट्राची मुंबईची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात मराठी शिकावेच लागेल मराठी बोलावे लागेल. आम्ही इतर भाषांचा अपमान करणार नाही, पण इथे येऊन मराठी शिकावेच लागेल ही शासनाची भूमिका आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भैय्याजी जोशी यांचे पूर्ण वक्तव्य मी ऐकलेले नाही. त्यामुळे ते ऐकून त्यावर मी बोलेन पण शासनाने मांडलेल्या भूमिकेशी देखील भैय्याजी जोशी यांचे दुमत असेल असे वाटत नाही, अशी पुस्ती देखील फडणवीस यांनी जोडली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App