– डॉ.आंबेडकरांनी भेट दिलेल्या संघस्थानावर बंधुता परिषदेचे आयोजन
विशेष प्रतिनिधी
कराड : ढोंगी पुरोगाम्यांपासून दलित समाज आणि देश वाचवायला हवा असा सूर बाबासाहेबांनी भेट दिलेल्या कराडच्या संघ स्थानावरून उमटला. इतिहासाच्या सागरातून कोळसा उगळायचा की चंदन हे आपण ठरवायचं. खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक कृती मधून बंधुता जोपासून आपण चंदनाचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी प्रयत्न करुया, आपली गावकी एक आहे पण भावकी सुद्धा एक झाली पाहिजे, असे प्रतिपादन बंधुता परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीपदादा रावत यांनी केले.
दिनांक २ जानेवारी १९४० या दिवशी कराड मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून ज्या ठिकाणास डॉ. आंबेडकरांनी भेट दिली, त्या श्री भवानी संघ स्थानावर बंधुता परिषद या वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन कराड येथे लोककल्याण मंडळ ट्रस्ट द्वारे करण्यात आले. “हिंदू संघटनेशिवय जातीभेद नष्ट होणार नाहीत” असे डॉ.आंबेडकरांचे विचार होते. त्याचप्रमाणे “सकल हिंदू, बंधू बंधू” या विचाराने रा. स्व.संघ हिंदू संघटनेचे काम करत आहे. असे रावत म्हणाले.
या परिषदेतील परिसंवादामध्ये आंबेडकरी विचारवंत ॲड क्षितिज टेक्सास गायकवाड, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, बौध्द युवक संघटनेचे अध्यक्ष ॲड विजय गव्हाळे या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या परिषदेच्या आयोजनाची भूमिका आपल्या प्रास्ताविकामध्ये विचारवंत श्री भरत आदमापुरे यांनी मांडली…
“लहानपणापासून गावात अस्पृश्यतेचे चटके सोसलेले असल्यामुळे मी बंधुतेच्या शोधात होतो. सुरुवातीच्या जीवनात तथाकथित पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांनी, विद्रोही लोकांनी, डाव्या विचारवंतांनी माझी दिशाभूल केल्याचे अनुभव मला आले. ढोंगी पुरोगाम्यांपासून दलित समाज आणि संपुर्ण देश आपण वाचवायला हवा. जातीभेद नष्ट करून बंधुता निर्माण करण्यासाठी आम्ही संघाच्या सोबत आहोत, असे प्रतिपादन मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या भाषणात केले.
“डॉ. आंबेडकरांवर सर्वाधिक अन्याय काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी केला आणि आज याच पक्षाचे नेते संविधान बचावचा नारा देत आहेत” असे प्रतिपादन ॲड. क्षितीज गायकवाड यांनी केले.
“देशाच्या फाळणीच्या वेळी सुद्धा बाबासाहेबांनी इस्लाम चा धोका वारंवार सांगितला होता. फाळणीविषयी कठोर भूमिका त्यांनी मांडली होती. त्यावर तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने आज बांगलादेश सारख्या ठिकाणी हिंदू, बौद्ध बांधवांवर अत्याचार होत आहेत. कलम ३७० सारख्या विषयात सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या राष्ट्रनिष्ठ भूमिकेमुळेच आज भारत सरकार ते कलम हटवू शकले. धर्म परिवर्तन करत असताना डॉ बाबासाहेबांनी भारतीय परंपरेतील बौध्द धर्मच का स्वीकारला याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. बंधुतेसाठी हिंदू समाजाने डॉ.आंबेडकर समजून घेतले पाहिजे.” असे मत ॲड विजय गव्हाळे यांनी व्यक्त केले.
परिषदेची सर्वात बुद्ध वंदनेने झाली. कार्यक्रमाचे संयोजन लोककल्याण मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष विजय जोशी यांनी केले. सूत्रसंचालन वैभव डुबल, प्रास्ताविक भरत आमादापुरे, तर परिसंवादाचे संचालन निलेश अलाटे यांनी केले. श्रीकांत एकांडे यांनी आभार मानले. यावेळी आमदार अतुल भोसले, विविध चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App